एखादी गोष्ट, ओळ, कविता, सुभाषित किंवा इतर तपशील, स्मरणात ठेवण्याच्या आपल्या स्वतःच्या प्रक्रियेचा आपण किती वेळात जाणीवपूर्वक विचार करतो? म्हणजे ज्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात त्या ‘का’ राहतात? त्यासाठी आपण काय केलेले असते? ते इतर गोष्टींच्या बाबतीत आपल्याला हुकमी पद्धतीने करता येऊ शकते का? येऊ शकेल का? तसेच या उलट, ज्या गोष्टी आपली इच्छा असूनही लक्षात राहत नाहीत त्या ‘का’ राहात नाहीत? या व अशा प्रश्नांचा यात समावेश होईल
माझ्या स्वतःच्या बाबतीत हा विचार करू जाता मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे जी गोष्ट लक्षात ठेवायची, त्याची काही तार्किक संगती लागल्याशिवाय ती गोष्ट माझ्या लक्षात राहात नाही. विशेषतः काव्यपंक्तिंच्या किंवा सुभाषितांच्या बाबतीत, अनेक वेळा गद्य वाक्यांच्या, थोरामोठ्यांच्या उक्तिंच्या बाबतीत सुद्धा, त्या लक्षात ठेवण्याची प्रक्रिया बहुदा पुढील प्रमाणे होते -
- मूळ वाचनाचा / पंक्तींचा अर्थ समजावून घेणे
- त्यामधील विचारांचा प्रवाह कसा वाहतो त्याचे आकलन करून घेणे
- त्या प्रवाहाचे जे काही नैसर्गिक विभाग होतात, ते विभाग, म्हणजेच पंक्तिंचे तुकडे समजून घेणे
- त्या तुकड्यांमधील शब्दरचना व त्यातील वैशिष्ट्ये समजावून घेणे
हे झाल्यानंतर ती पंक्ती / वचनं, तिच्या विघटित स्वरुपात, स्मरणात राहाते. जेव्हा ती उद्धृत करण्याची आवश्यकता निर्माण होते तेव्हा -
- मूळ वचनाचा अर्थ किंवा त्यातील विचारांचे स्मरण करणे
- त्या विचारांचा प्रवाह मनात पुन्हा जागृत करणे
- त्या प्रवाहाचे जे नैसर्गिक विभाग होतात, ते पुन्हा स्मरणात आणणे. यासाठी मूळ विचार व त्यातील विभागांची परस्पर तर्क-संगती मुळात नीट लक्षात आलेली असणे आवश्यक आहे.
- त्या तुकड्यांची जी विशिष्ट अभिव्यक्ती मूळ पंक्तीमध्ये होती, त्याच्या जवळपास जाणारी भाषिक पुनर्रचना करणे. ही करत असताना प्रायः छोटे-छोटे तुकडे पुन्हा घटित करावे लागतात. ते करताना बहुतेक वेळा त्या छोट्या तुकड्यांपुरते मूळ चरणाचेच स्मरण होते.
- हे तुकडे, त्यांच्या तर्क-संगतीनुसार एकमेकांना जोडून मूळ पंक्ती किंवा वचन पुनर्घटित करणे
मात्र, या प्रक्रियेत, ज्याचा अर्थ कळलेला नाही अशी वचने किंवा त्यांचे भाग, यांचे पाठांतर करणे अवघड होते.
अर्थात् ही वैयक्तिक प्रक्रिया आहे. अशा अनेक प्रक्रिया असण्याची, किंबहुना प्रत्येक व्यक्तीची अशी विशिष्ट व्यक्तिसापेक्ष प्रक्रिया असणेही शक्य आहे. आपापल्या प्रक्रियेचा प्रत्येकाने विचार केल्यास कदाचित ती अधिक जाणीवपूर्वक करणे शक्य होईल.
शिवाय ही प्रक्रिया प्रौढ वयात अधिक उपयोगी ठरेल असे वाटते. लहान वयात मेंदूची ‘पाठांतर’ करण्याची (अर्थ न कळताही स्मरणात ठेवण्याची) क्षमता अधिक प्रगल्भ असते असे दिसते. या वयात नुसते पुन्हा-पुन्हा वाचूनही गोष्टी लक्षात राहतात. तसेच या वयात पाठ केलेल्या गोष्टी दीर्घकाळ स्मरणात राहतात असे दिसते. वैयक्तिक उदाहरण द्यायचे झाल्यास मी इयत्ता दुसरीमध्ये पाठ केलेली रामरक्षा माझी मुलगी दुसऱ्या किंवा तिसर्या इयत्तेत असताना तिला शिकवण्यासाठी ‘आठवली’ तेव्हा एखादी जागा वगळता कुठेही पुस्तकाचा आधार घ्यावा लागला नाही. मधल्या अनेक वर्षात किंबहुना दशकात मी रामरक्षा फार तर दोन-चारदा म्हटली असेल. पण ती कायमची स्मरणात असल्याप्रमाणे ‘आठवली.’
स्मरणशक्तीच्या बाबतीत आणखी एक उल्लेखनीय गोष्ट अशी की, लक्षात ठेवलेली गोष्ट नुसती पुन्हा-पुन्हा वाचल्याने किंवा लिहिल्याने सुद्धा जितकी चांगली लक्षात राहणार नाही, तितकी चांगली ती ‘आठवल्या’ने (रीकॉल केल्याने) लक्षात राहते. नुकतीच पाठ केलेली गोष्ट थोड्या वेळाने विसरून जाते, पण ती जर एकदा तरी ‘आठवली’ (यासाठी ती मोठ्याने म्हणणे किंवा कोणाला सांगणे हे जास्त चांगले), तर ती दीर्घकाळ स्मरणात राहण्याची क्षमता पुष्कळ वाढते असा माझा अनुभव आहे. यासाठी ज्या गोष्टी पाठ व्हायलाच हव्यात (विशेषतः विद्यार्थ्यांसाठी) त्या गोष्टी वारंवार म्हणून बघणे उपयोगाचे ठरू शकते.
या उलट, ज्या गोष्टींची अर्थाच्या दृष्टीने संगती लावता येत नाही, अशा गोष्टी लक्षात राहणे माझ्या दृष्टीने अत्यंत अवघड जाते - उदाहरणार्थ, दूरध्वनी क्रमांक. म्हणजेच एखादी गोष्ट लक्षात राहण्यासाठी, किमान प्रौढ वयात तरी, तिचा अर्थ समजणे आवश्यक असते असे दिसते.
ही पद्धती माझ्यासाठी उपयोगी ठरते असे म्हटले आहे व म्हणून ती इथे दिलेली आहे, त्यामागे तिचा इतरांना उपयोग होऊ शकेल अशी भावना आहे. मात्र हे करत असताना प्रत्येकाने जागरूकपणे आत्मनिरीक्षण करणे व स्वत:ला सर्वाधिक उपयुक्त ठरेल अशा तर्हेने त्या पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे.
तसेच या निमित्ताने याही गोष्टीचा विचार करायला हवा की कोणतीही गोष्ट लक्षात ठेवणे ही गोष्ट मुळातच किती आवश्यक मानावी? विशेषतः शालेय शिक्षणाच्या बाबतीत हा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. आपल्या पारंपरिक विचारात पाठांतराचे महत्त्व निर्विवाद आहे.
पुस्तकस्था तु या विद्या, परहस्तगतं धनं । कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद्धनम् ।।
हा विचार तेथे अनेकदा आढळतो. पुस्तकात असलेली विद्या व दुसर्याच्या हातात असेलंल (आपलं) धन प्रसंग आल्यावर निरूपयोगी ठरतात हा पारंपरिक विचार आहे. आधुनिक शिक्षण पद्धतीत अनेक वेळा पाठांतर अनावश्यक मानण्यावर भर असतो. एखादी संकल्पना मुलांना कळणे, तो त्यांना वापरता येणे हे महत्त्वाचे ती नुसती पाठ होऊन उपयोगाची नाही, हा विचार योग्यच आहे. मात्र हा विचार प्रामुख्याने संकल्पना – त्यातही वैज्ञानिक किंवा गणिती संकल्पनांच्या संदर्भातून आलेला आहे. तिथे सुद्धा पाढ्यांच्या किंवा सूत्रांच्या पाठांतराचा प्रश्न येतोच. जेव्हा भाषेचा विचार येतो, तेव्हा शब्दसंग्रह, म्हणी, वाक्प्रचार, वचने, कविता या गोष्टी कंठस्थ असल्याशिवाय त्यांचा वापर करता येत नाही. या गोष्टी कंठस्थ होण्यासाठी मुळातच स्मरणशक्ती चांगली असणे आवश्यक असते. इतर कोणत्याही मानवी शक्तीप्रमाणे स्मरणशक्तीसुद्धा प्रयत्नपूर्वक वाढविणे शक्य असते, किंबहुना ती तशीच वाढवावी लागते.
यासाठी पाठांतराला सरसकट विरोध करण्याचा पुनर्विचार करायला हवा.

Comments