सखोल, मूलगामी चिकित्सा; स्वतंत्र विचार; आपण जे करतो ते ‘का’ करतो याची पक्की जाणीव; कोणत्याही प्रभावापुढे डगमगून न जाता ह्या जाणिवेवर ठाम राहण्याची ‘निर्भय साधना’; आणि ह्या सर्वांबरोबर अतिशय प्रभावी, कलात्मक व सौंदर्यपूर्ण सृजन करू शकणार्या; अक्षरशः एका हाताच्या बोटावर मोजता येतील अशा महान कलाकारांमधे कुमारजींचा समावेश होतो. त्यांच्या सर्वस्पर्शी व्यासंगाला आणि कुतुहलाला कोणताही विषय वर्ज्य नव्हता. कुमारजींच्या प्रत्येकच प्रस्तुतीत त्यांच्या ह्या सर्वस्पर्शी व्यासंगाचे दर्शन व्हायचे. विषयवस्तूची मांडणी साकल्याने, सर्व बाजूंनी विचार करून केलेली असायची. त्यात वर्षानुवर्षे गृहित धरलेल्या विचारांना छेद देऊन, अतिशय आनंददायक असा नवा विचार देण्याचे सामर्थ्य होते. ह्या सामर्थ्यामुळेच कुमारांचे रसिकांच्या मनात एकमेवाद्वितीय असे स्थान आहे.
त्यांनी लोकांसमोर मांडलेले कवी-दर्शनाचे कार्यक्रमही ह्याला अपवाद नव्हते. कुमारजींनी भारतीय परंपरेतील अनेक कवींच्या रचना रसिकांपुढे सादर केल्या. ह्यात अनेक संत-कवींचा समावेश होता. मात्र ह्या मालिकेतील प्रत्येक संत - कबीर, मीरा, सूरदास, तुलसीदास व तुकाराम हे अतिशय श्रेष्ठ दर्जाचे कवीसुद्धा आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे. कुमारजींची अभिव्यक्ती ही संगीतात्मक असल्याने ह्या संतांचे ‘संतत्व’ आणि कुमारजींची प्रतिभा ह्यांचा संगम होण्याचे ठिकाण म्हणजे ह्या संतांचे काव्य हे जर लक्षात घेतले तर ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. ह्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी केवळ त्या कवीच्या रचना संगीतबद्ध करून मांडल्या असे नव्हे तर त्या कवीचे काव्यात्म व्यक्तिमत्व, त्यामागच्या प्रेरणा, त्यातील सौंदर्यदृष्टी, त्याचा वेगळेपणा आणि महत्त्वाचे म्हणजे त्या प्रत्येकाची विशिष्ट अशी ‘सांगीतिकता’ ह्यांचे अनेक बाजूंनी दर्शन घडवून दिले. ह्या मालिकेत त्यांनी तांब्यांचा समावेश केला ही आश्चर्याची नसली तरी विचार करण्याजोगी गोष्ट आहे.
तांबे कुमारांना का भावले असावेत, आणि त्यांच्या कवितेचे ‘दर्शन’ कोणकोणत्या अंगांनी त्यांनी आपल्याला करून द्यायचा प्रयत्न केला हा आज आपल्या अभ्यासाचा व इंटरप्रिटेशनचा भाग आहे. मात्र मराठी कवितेतील तांब्यांचे स्थान; हिंदुस्थानी संगीतातील कुमारजींचे स्थान आणि हे दोन दिग्गज एकत्र आल्यानंतर निर्माण झालेल्या संगीताची अलौकिकता ह्या सर्वांच्या अत्युच्च दर्जाचा विचार कुमारजींच्या या कार्यक्रमाच्या संदर्भात व्हायला हवा.
सुमारे चाळीस वर्षांपूर्वी जेव्हा कुमारजींनी हा कार्यक्रम केला तेव्हा तांब्यांच्या कवितेशी जवळून परिचय असलेले पुष्कळ लोक होते. इतकेच काय पण प्रत्यक्ष तांब्यांच्या संपर्कात आलेलेही अनेक लोक त्यावेळी असणार. ह्या लोकांना तांब्यांची भाषा आजच्या पिढीला वाटते तितकी ‘जुनी’ वाटत नव्हती – किंबहुना ती त्यांच्या भाव-जीवनाचा भाग होती. आजच्या पिढीची जीवनशैली खूपच बदललेली आहे. त्यामुळे आज हा विचार करताना, वाचकांसमोर फक्त कुमारजींनी घडविलेले तांब्यांच्या कवितांचे ‘दर्शन’ मांडून भागणार नाही. तांबे, त्यांचे व्यक्तित्व आणि त्यांच्या कवितेची थोडी ओळख करून देणेही आवश्यक आहे.
☀☀☀
तांब्यांचा काळ आधुनिक मराठी कवितेच्या पहिल्या तीन पिढ्यांना समांतर जातो. केशवसुत, विनायक, रेव्ह. टिळकांची पहिली पिढी; गोविंदाग्रज, बी, बालकवींची दुसरी पिढी; व रविकिरण मंडळाची तिसरी पिढी ह्या तीनही पिढ्या तांब्यांनी पाहिल्या. मात्र ह्यातल्या कोणत्याही पिढीचे ‘प्रतिनिधी’ त्यांना म्हणता येत नाही इतके ते स्वतंत्र राहिले. तांब्यांचे हे वेगळेपण कशामुळे आहे? खांडेकर म्हणतात की तांब्यांनी आधुनिक मराठी कवितेला ‘सौंदर्य आणि माधुर्य याची जोड दिली’. तांबे हे कशामुळे करू शकले? ह्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी आपल्याला तांब्यांचा कवितेकडे – आणि खरं तर आयुष्याकडे - बघण्याचा दृष्टिकोन समजून घेणे आवश्यक आहे. तांब्यांची कलाविषयक तात्त्विक भूमिका आणि त्यांची कविता ह्यात संपूर्ण एकवाक्यता आहे. बोलताना एक विचार आणि प्रत्यक्ष कलाकृतीत मात्र दुसरा विचार असे त्यांच्या बाबतीत आढळत नाही. म्हणूनच ही भूमिका समजून घेणे आवश्यक आहे.
☀☀☀
कवीचे व्यक्तित्व हा कवितेच्या निर्मितीतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे असे तांबे म्हणतात. ‘आम्हाला वगळा गतप्रभ झणी होतील तारांगणे’ ही केशवसुतांची ओळ त्यांना भावते. मात्र ह्या व्यक्तित्वाचा अर्थ कवीची अहंता किंवा अहंकार नाही हे ही ते लगेचच सांगतात. ह्या दोन विचारांची सांगड कशी घालायची? त्यावरचे तांब्यांचे उत्तर हे त्यांच्या वेगळेपणाचे मर्म आहे.
निर्मितीची प्रक्रिया सांगताना ते म्हणतात की निसर्गातील कोणतीही वस्तु अगोदर कवीच्या हृदयात प्रवेश करते, नंतर भावनांच्या मुशीमधे तिला रसरूप प्राप्त होते आणि मग ती मूर्त होऊन बाहेर पडते. रुपान्तराची प्रक्रिया तांब्यांनी अशी मांडली आहे. तांबे म्हणतात “हे अनंताचे अमृतसरोवर आपल्या हृदयात तुडुंबले आहे. त्यात निसर्गातील रूपांच्या प्रतिमा पोहोचून सुस्नात झाल्या म्हणजे त्या द्विजन्म पावून हृदयातील अनंत किरणांनी लखलखत बाहेर पडतात.” हा द्विजन्म म्हणजे पुनर्जन्म महत्त्वाचा. कला ही निसर्गाची केवळ नक्कल नव्हे तर ती प्रतिभेने निर्मिलेली प्रतिसृष्टी आहे. नाहीतर ‘आरशात पडलेल्या प्रतिबिंबाला उत्कृष्ट कलाकृती म्हणण्याचा अतिप्रसंग ओढवेल’ असे तांबे म्हणतात. ‘केवळ वास्तवाचे यथातथ्य चित्रण करण्यात धन्यता मानणारी कला हीन दर्जाची होय’ असे तांब्यांना वाटते. हृदयातील ह्या अमृताच्या सरोवराचे स्थान जरी कवीचे व्यक्तित्व हे असले तरी त्याची निर्मिती मात्र कवीची नव्हे. ते काम ईश्वराचे. आणि म्हणूनच ह्या प्रक्रियेत कर्तेपणाची भावना ते स्वतःकडे घेत नाही. अहंकार नसलेल्या व्यक्तित्वप्रधानतेचा समन्वय तांबे लावतात तो असा. एकदा ही कर्तेपणाची भावना टाकून दिली की मग नदी जशी तिला ‘वाहावे लागते’ म्हणून वाहते, आणि त्यात तिला अद्भुत आनंद प्राप्त होतो, तसेच कवीचे होऊन जाते. मग कवी हा ईश्वराच्या हातातील साधन बनतो व कविता करणे हेच त्याचे स्वत:चे ‘साध्य’ बनून जाते.
ह्याच कारणामुळे निसर्गातील कोणतीही वस्तु किंवा घटना तांब्यांच्या काव्यनिर्मितीचा विषय होऊ शकते. कारण कलाकृती ही त्या वस्तुच्या केवळ वास्तवाचे अनुकरण करत नाही तर त्याच्यातील ‘आयडियल’चे - की ज्याला तांबे ‘कल्पनीय’ असा शब्द वापरतात - त्या कल्पनीयाचे अनुकरण असते. ‘आपल्या प्रतिभेच्या बळावर कल्पनीयाच्या अगदी निकट जाणे ज्याला शक्य होते तोच खर्या अर्थाने थोर कवी होय’ असे ते मानतात.
वास्तवातील “दुःख आणि विरूपता हा ‘चोथा’ फेकून देऊन ‘निर्भेळ सत्वाचे संपूर्ण सौंदर्य’ कवीला प्रतीत होते ते हृदयान्तर्गत सर्वतः पूर्ण अशा सत्वामुळेच. ललितकला बहुविध विरूपतेच्या ठायी एकरूप सौंदर्य पाहतात, अपूर्णतेच्या ठायी सौंदर्य पाहतात, दुःखाच्या ठायी सुखाचा अनुभव घेतात. यामुळेच बीभत्स आणि भयानक या रसांना ललितकलांमध्ये स्थान आहे” असे तांबे म्हणतात.
ह्यामुळेच वास्तव जगातील विरूपतेचे, असत्याचे, आणि व्यथांचे त्यांना कधीच भय वाटले नाही (वाळिंबे). ‘अमुचा प्याला दुःखाचा, डोळे मिटुनी प्यायाचा’ असे केशवसुतांप्रमाणे आपणही म्हणावे असे तांब्यांना कधीही वाटले नाही ते याचमुळे. नैराश्यातून आलेली कविता लिहिण्याची वेळ तांब्यांवर आली नाही असे जोग म्हणतात. पण ते तितकेसे खरे नाही. त्यांच्या आयुष्यात तश्या वेळा अल्याही असतील, पण तशी कविता लिहिण्याची त्यांची प्रवृत्तीच नव्हती हे जास्त खरे. नैराश्याला कुरवाळत न बसता सतत पुढे जाण्याची त्यांची वृत्ती हे ही त्यांच्यातील व कुमारांमधील एक साम्य.
जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक अनुभवाकडे जणू ईश्वरी लीला म्हणून पाहण्याची, एखाद्या संताची वृत्ती तांब्यांना लाभली होती असे म्हणावेसे वाटते. मात्र या वृत्तीशी सामान्यतः जोडली जाणारी विरक्तीची भावना मात्र त्यांच्यात दिसत नाही. ते जीवनाचे आकंठ पान करून कायम आनंदात डुंबलेले दिसतात. त्यांची कविता हे त्यांच्या व्यक्तित्वाचेच चित्र असल्याने त्यांचा हाच गुण त्यांच्या कवितेतही पूर्णपणे उतरलेला दिसतो. यामुळेच त्यांच्या कवितेत सुख, दुःख, कारुण्य, शृंगार, रती या सर्व भावना दिसतात – पण त्या सात्विक होऊन प्रकटतात. प्रणयप्रधान कविता लिहितानाही ‘एका सखीच्या हृदयि पूर्णता लाभे संसारी’ असे म्हणणारी सात्विकता, पावित्र्य, व प्रतिष्ठा (dignity) ते सोडत नाहीत. या कार्यक्रमात समाविष्ट केलेली ‘सहज तुझी हालचाल’ ही कविता ह्या भावनेची उत्कृष्ट प्रतिनिधी आहे.
☀☀☀
एका बाजूला कला व त्यातून निर्माण होणारा सात्विक आनंद ह्यामुळे कला हेच ‘साध्य’ मानणारा विचार तर दुसर्या बाजूला कलेने समाजातील दुःखे, अनीति, अन्याय इत्यादींशी लढण्याचे ‘साधन’ बनावे असे मानणारा ‘आधुनिक’ विचार ह्यात तांबे निभ्रान्तपणे (decidedly) पहिल्या विचाराचे समर्थन करतात. मात्र कलेचा नीतीशी काहीच संबंध नसावा असे तांब्यांचे मुळीच म्हणणे नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
नदी ही तिला ‘वाहावे लागते’, कोणीतरी तिला तशी प्रेरणा देतो म्हणून वाहते. तीरावरच्या लोकांना पाणी मिळावे, शेती करता यावी असल्या उपयुक्ततावादी विचारांनी नदी वाहात नाही! मात्र तरीही ते सर्व फायदे नदीमुळे होतातच. तांब्यांचा कलेतील नीतिविषयक दृष्टिकोन असाच आहे. त्यामुळेच “कवी नीतिशिक्षणाच्या भानगडीत पडत नाही, तत्त्वज्ञानाचा बाणा बाळगीत नाही तथापि त्याच्या कृतीत अत्युन्नत नीति आणि निर्दंभ आणि सत्य असे तत्त्वज्ञान ओथंबलेले असते” असे तांबे म्हणतात. मात्र ह्यासाठी ‘समाजसुधारणेचा टेंभा मिरविणे’; ‘राजकारणाचे डोलारे उभे करणे’; ‘तत्त्वज्ञानाचे दुकान घालणे’ ह्या गोष्टी करण्याची गरज नाही ह्याविषयी तांबे आग्रही आहेत. कवितेतील सौंदर्याच्या उपासनेत स्वतःला पूर्णपणे विसरल्यानंतर प्रकटणारी स्वयंसिद्ध नीति सोडून हेतुपुरस्सर, काहीतरी उद्दिष्ट मनात ठेवून प्रतिभेचे पंख जखडून टाकणे त्यांना मुळीच मान्य नाही व त्यातून कोणताही चिरस्थायी नीतीचा संदेश देता येतो यावर त्यांचा विश्वास नाही. आपण ‘प्रेषित नाही, कवी आहोत ह्याचे तांब्यांचे भान पक्के आहे. (जोग) काळाने कशाचेही स्तोम माजवले तरी खर्या कलाकाराने “आपल्या कक्षेतून ढळता कामा नये” ह्यावर ते ठाम आहेत. तांबे व कुमारांच्यातील हे साम्य फार लक्षणीय आहे.
☀☀☀
तांब्यांच्या कवितेचा, त्यांच्या कलादृष्टीचा आणखी एक विशेष म्हणजे त्यांची संगीताची जाण व त्यांच्या कवितेत प्रकट होणारी ‘सांगीतिकता’. विविध ललितकलांच्या परस्पर संबंधाची त्यांची जाणीव ह्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. विविध ललितकलांची शरीरे भिन्न असली तरी त्यांचा आत्मा एकच आहे ह्यावर त्यांचा विश्वास आहे. हृदय हेलावून टाकणे व भावजागृती करणे हा कलेचा उद्देश असेल तर ह्या बाबतीत जे सामर्थ्य भाषेचे आहे त्याच्या मानाने संगीताचे सामर्थ्य किती तरी अधिक उत्कट आहे ह्या विचारावर तांब्यांनी भर दिला आहे (वाळिंबे). तांबे म्हणतात – “काव्यकला व गायनकला या दोन बहिणींत अग्रमान जरी पहिलीचा असला तरी, हृदयाच्या अंतर्गूढ प्रदेशात अतिसूक्ष्म, विद्युच्चंचल भावनांचा व्यापार सुरू करण्याचे सामर्थ्य जितके केवळ नादानुजीवी असणार्या दुसरीचे (म्हणजे संगीतकलेचे), तितके जड शब्दातून प्रकटणार्या पहिलीचे नाही.” ह्या त्यांच्या मतावरून त्यांनी वैणिक गीतांना (वीणेवर तालासुरात गाता येतील अशा गाण्यांना) इतके महत्त्व का दिले आहे ते स्पष्ट आहे.
तांब्यांवर संगीताचे संस्कार फार लहानपणापासून झाल्याचे त्यांचे चरित्रकार सांगतात. पुढे त्यांनी संगीताचे रीतसर शिक्षणही घेतले होते. ग्वाल्हेर, इंदूर परिसराततील संस्थानी वातावरणात त्यांना फार मोठमोठ्या गवयांना ऐकण्याची संधीही मिळाली. प्राचीन भारतीय सौंदर्यशास्त्र तसेच कलाविषयक पाश्चात्य विचार ह्या दोन्हीचा त्यांचा व्यासंग मोठा होता. ह्या सर्वांचा परिणाम त्यांच्या काव्यातील सांगीतिकतेवर झाला आहे.
ही सांगीतिकता म्हणजे केवळ वृत्तबद्ध रचना करून गीताला चाल लावणे सोपे करण्याइतकी ढोबळ नव्हती. तर ज्याप्रमाणे प्रत्येक प्रसंगाचे नाटक होऊ शकत नाही, त्यात अंगभूत असलेले नाट्य दिसण्याची दृष्टी व ते मांडण्याची प्रतिभा नाटककाराकडे असावी लागते, त्याचप्रमाणे प्रत्येक कवितेचे गाणे होऊ शकत नाही. त्यातील सांगीतिकता हेरण्याची शक्ती व मांडण्याची प्रतिभा कवीकडे असावी लागते. ही शक्ती व प्रतिभा तांब्यांकडे मुबलक होती व त्यामुळेच ते आधुनिक मराठी गीतीकाव्याचे प्रणेते ह्या पदवीला पोहोचले. कुमारांना तांबे भावण्यामागे ही सांगीतिकता हे निःसंशय फार मोठे कारण आहे. “ज्या भावनांची नीट मर्यादाही कळत नाही अशा सूक्ष्म भावना कोणते शब्द प्रकट करू शकतील? तात्पर्य की, इतक्या तरल, चंचल, सूक्ष्माहून सूक्ष्म भावना प्रकट करण्याचे बल संगीताचे अंगी आहे की त्यापुढे शब्दांची किंमत ती काय? भाषेची प्राज्ञा काय?” असे म्हणायला हा ‘कवी’ मागेपुढे पाहत नाही इतकी त्यांची सौंदर्यदृष्टी अभिनिवेशविहीन आहे.
संगीताचे शिक्षण घेतल्यानंतरच्या काळातील त्यांच्या कविता तर ह्या दृष्टीने अधिकच समृद्ध आहेत. ह्यातील अनेक कवितांवर त्यांनी रागांची नावे सुचविलेली आहेत. ह्यातील जवळजवळ सर्व सूचना मान्य करून कुमांरांनी तांब्यांच्या संगीतदृष्टीला मान्यताच दिलेली आहे ही गोष्टही इथे नोंदविणे आवश्यक आहे.
☀☀☀
कलेच्या निर्मितीच्या प्रक्रियेचा मूलगामी विचार करू शकणारा, तो भाषेत मांडू शकणारा, व त्यानुसार स्वतः सृजन करू शकणारा कुमारांसारखा कलाकार खरोखर विरळाच असे आम्ही सुरुवातीसच म्हंटले आहे. अगदी हेच वर्णन कवितेच्या संदर्भात तांब्यांना लागू होते. ही निर्मितीप्रक्रियेची जाणीव, ती तशी ‘का’ आहे ह्या संबंधीचा अनुभूतिजन्य ठामपणा ह्यामुळेच कुमार व तांबे दोघेही आपापल्या ‘कक्षेतून कधीही ढळत नाहीत’.
विविध ललितकलांचा परस्पर-संबंध व त्यामागील सौंदर्याची पाश्चात्य प्रभावाने समृद्ध झालेली पण मूलतः निखळ भारतीय अशी कलादृष्टी ह्यामुळे ह्या दोघांचेही पाय जमिनीपासून कधीही सुटत नाहीत. त्यांच्या कलेबद्दल मतभेद होऊ शकतात पण त्यांच्यावर पोथिनिष्ठपणाचा, गतानुगतिकत्वाचा, तसेच काळाबरोबर वाहावत जाण्याचा; कलेशी एकनिष्ठ नसल्याचा, किंवा बेगडीपणाचा आरोप मात्र त्यांचे कट्टर टीकाकारही करू शकत नाहीत. स्वतःचा वेगळा विचार - तो तसा ‘का’ आहे ह्याबद्दलची सुस्पष्ट व निभ्रान्त जाणीव असल्यामुळे – हे दोघेही छातीठोकपणे मांडू शकतात. ही ‘निर्भय-साधना’ हे ह्या दोघांमधील आणखी एक साम्यस्थळ.
ह्याच कारणामुळे फार मोठमोठ्या, दिग्गज अशा पूर्वसूरींचा संपर्क येऊनही, त्याच योग्यतेच्या अनेकांना समकालीन असूनही, हे दोघेही कोणत्याही घराण्याच्या किंवा संप्रदायाच्या ठोकताळ्यात बसवता न येण्या इतके स्वयंप्रकाशी राहतात.
आपल्या कलेमागील स्वतःची बुद्धि, कष्ट आणि अभ्यास यात कोणतीही कमी पडू न देताही त्या कलेकडे ईश्वरी प्रसाद म्हणून पाहण्याची सात्विकताही ह्या दोन दिग्गजांना जोडते. मात्र ह्या सात्विक प्रवृत्तीलाही पुरून उरणारी जीवनाच्या सर्व अंगांबद्दलची लालसा ह्याही बाबतीत हे दोघे एकमेकांच्या जवळ जातात.
कलेतील सौंदर्याला हे दोघेही सर्वोच्च स्थान देतात. कलेचा व्यापारी उपयोग तर दूरच, पण कोणत्याही प्रकारे हेतुपुरस्सर उपयोग करणे ह्या दोघांनाही मान्य नाही.
ह्या सगळ्याबरोबरच माळव्याच्या भूमीचा ह्या दोघांच्याही सौंदर्यदृष्टीवर असलेला प्रभाव हे ही साम्यस्थळ नोंदवून ठेवण्यासारखे आहे.
कुमारजींनी केलेल्या तांब्यांच्या कवितेच्या मांडणीत त्यांनी तांब्यांच्या कवितेचा, त्यांच्या कलादृष्टीचा अशा प्रकारे विविध अंगांनी परामर्श घेतलेला आहे. हे तांब्यांच्या काव्याचे कुमारांच्या प्रतिभेच्या अमृतसरोवरात सुस्नात झालेले ‘दर्शन’ आहे असे म्हणावेसे वाटते.
संदर्भ
- तांबे गीत रजनी । पं. कुमार गंधर्व । ध्वनिमुद्रण । १९७४
- तांबे यांची समग्र कविता । व्हीनस प्रकाशन । पुणे । २००४
- कविवर्य तांबे साहित्यविचार । तांबे जन्मशताब्दी स्मारक समिती प्रकाशन । १९७४
- तांबे यांची कलाविषयक भूमिका । रा शं वाळिंबे
- महाराष्ट्र साहित्य पत्रिका - तांबे विशेषांक । डिसेंबर १९७३
- तांबे आणि त्यांचे गीतिकाव्य । भवानीशंकर पंडित । व्हीनस प्रकाशन । पुणे । १९७२
- मधुघट रसदर्शन । संपादक - वा रा ढवळे । महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग । १९७५
- तांबे – एक अध्ययन । रा अ काळेले । कॉन्टिनेन्टल प्रकाशन । पुणे । १९५६
- मराठी विश्वकोश । खंड ४ व खंड ७



Comments