Skip to main content

दर्शन


एखादी गोष्ट आपल्या डोळ्यांसमोर आली तर ती आपल्याला ‘दिसली’ असं आपण म्हणतो. पण काही गोष्टींच्या बाबतीत निव्वळ ‘दिसणं’ हा शब्दप्रयोग पुरेसा वाटत नाही. अश्या गोष्टींचं दिसणं नुसतं आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देतं इतकच नाही तर दृष्टीच्या द्वारे आपल्या मनावर काही ‘संस्कार’ करून जातं. हा संस्कार बीजरूपाने झाला तरी नंतर वर्षानुवर्षे त्याचा आपल्या आत वृक्ष होत राहतो. हे केवळ ‘दिसणं’ नसतं, तर ते ‘दर्शन’ असतं.

पंढरपूरला पहिल्यांदा गेलो तेव्हा रांगेतून चालत होतो. ही रांग अशीच अजून बराच काळ चालणार असं वाटत असतानाच अचानक एका वळणानंतर प्रत्यक्ष पाण्डुरङ्गच समोर आला होता. काल तसंच गाडीतून जाता-जाता; हिमालयाचं जंगलांनी भरलेलं हिरवं हिरवं रूप पाहत असतानाच, एका वळणावर, ‘तो’ असाच त्याच्या हिमाच्छादित, भव्य, ‘पाण्डुरङ्ग’ रूपातच समोर आला. क्षितिजावर दृष्टी जाईल तिथपर्यंत त्याचं ते विश्वरूप पसरलेलं होतं. मी बर्फाच्छादित महापर्वत काही पहिल्यांदाच पाहात नव्हतो. याआधी मी आल्प्स आणि रॉकीज पाहिले होते, त्यात फिरलो होतो. त्यांचं सौंदर्य, त्यांची भव्यताही अद्भुतच आहे. पण हिमालयात दिसलं ते ‘पावित्र्य’, मनावर संस्कार करण्याची ती क्षमता त्यांच्यात मला दिसली नाही. हा अर्थातच माझ्या सांस्कृतिक जडणघडणीचा भाग असणार. हिमालयाच्या माझ्या मनात, माझ्या सांस्कृतिक वारश्यातून आलेल्या प्रतिमेचा परिणाम असणार. संस्कृतात एक सुभाषित आहे,

मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ ।

यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी ॥

मंत्र, तीर्थ, देव, साधू, ज्योतिषी, वैद्य, आणि गुरु, यांच्यासंबंधी जशी आपली भावना असेल तसं आपल्याला फळ मिळतं. इथे माझ्यासमोर असलेला पर्वत तीर्थस्वरूपच होता. ते दुसरे दोघे नुसतेच भव्य पर्वत होते. त्यांच्याबद्दल माझी तशी भावना नसल्याने मला तशी फलसिद्धी मिळाली नसणार. इथे भावना होती, तर मिळाली. त्या दोन पर्वतांनी मला दिपवून टाकलं होतं, हिमालयानं विरघळवून टाकलं. त्याच्याकडे एकटक बघणार्‍या मला बरोबरच्या कोणीतरी विचारलं, ‘काय वाटतंय तुला?’ म्हंटलं, ‘हात जोडावेसे वाटतात.... दुसरं काही नाही.’

कालिदासानं त्या नगाधिराजाला ‘देवतात्मा’ असंच म्हंटलं आहे. ‘देवता हा ज्याचा आत्मा आहेत तो’, किंवा ‘जो देवतांचा आत्मा आहे तो’ अश्या कोणत्याही पद्धतीने या समासाचा विग्रह केला तरी चालेल. किंबहुना तो नुसता ‘अदृश्य’ आत्मा नाही, तर प्रत्यक्ष महादेवच ‘दृश्य’ स्वरूपात त्याच्या रूपाने प्रकट झालेला आहे. भस्माच्छादित पांढरं, ‘पाण्डुरङ्ग’ शरीर, मस्तकातून वाहणारी गङ्गा, चंद्र जणू त्याच्या मस्तकावर टेकलेलाच आहे असं वाटावं इतकी प्रचंड उंची, त्याच्या अंगाखांद्यांवर खेळणारे असंख्य प्राणी आणि अवतीभवती असणारे अनेक योगी, भक्त, साधक गण, यांना घेऊन ध्यानस्थ बसलेला तो पशुपती शिव. आपल्या संस्कृतीत जे-जे उदात्त, पवित्र आहे त्या सगळ्याचा मूलस्रोत, आदिपुरुष, आदिनाथ.

ज्या रूपात त्यानं मला काल दर्शन दिलं त्यात पतितोद्धारिणी गङ्गेचं जन्मस्थान असलेलं 'गंगोत्री'चं शिखर होतं, तसंच, जिथून युधिष्ठिर स्वर्गाला गेला ते 'स्वर्गारोहिणी'ही होतं. मोक्ष आणि धर्म या दोन्ही पुरुषार्थांची, त्यांना प्राप्त करण्याचा प्रयत्न करण्यात निष्काम-कर्म-भावनेनी आपली आयुष्यं झोकून देणार्‍या हजारो, लाखो स्त्री-पुरुषांच्या धैर्याची आणि निष्ठेची स्मारके. हिमालय आपल्या संस्कृतीपासून निराळा करता येतच नाही, तो असा.

आपल्या हजारो योजनं प्रवासात, तीरावरच्या करोडो माणसांना, कोणतीही अपेक्षा न ठेवता, निरलसपणे ‘जीवन’ देणारी, आणि बदल्यात त्या लोकांनी दिलेली घाण तितक्याच शांतपणे ग्रहण करणारी माता गङ्गा. हे करणारी गङ्गा ही काही एकटीच नदी नव्हे, पण गङ्गा जणू ‘एक नदी’ या स्वरूपात न राहाता, सगळ्या नद्यांचं, त्यांच्या नदीत्वाचं प्रतीक बनली आहे. तिचं नाव घेतलं की सगळ्या नद्यांचं नाव घेतल्यासारखंच आहे. अश्या या गङ्गेच्या पावित्र्याचं मूळ तिच्या या क्षमाशील औदार्यात, तिच्या निष्काम दातृत्वात असेल काय? हृषिकेशला तिचं आध्यात्मिक रूप दिसतं, हरिद्वारला त्या रूपाबरोबरच तिचं धार्मिक रूपही दिसतं. तिच्या प्रवाहाकडे बघत बसलो तर आपल्या संस्कृतीचा सगळा चित्रपट दिसतो. रामाने, कृष्णाने, बुद्धाने या नदीत स्नान केलं आहे, तिच्या पाण्याने आपली तहान भागवली आहे. तृष्णेने तडफडणार्‍या करोडो जीवांची तहान भागवणारे हे महापुरुष – त्यांची तहान भागवणं ही काय साधी गोष्ट आहे? कबीर, तुलसीदासांपासून रामकृष्ण, विवेकान्दांपर्यंत सत्पुरुषांची अखंड परम्परा तिच्या काठावर नांदली आहे. त्या गङ्गेचं जन्मस्थान असलेलं ‘गंगोत्री’!

सगळं महाभारत सांगून झाल्यानंतर, स्वर्गारोहण पर्वाच्या शेवटी सौती हताशपणे म्हणतो,

ऊर्ध्वबाहुर्विरौम्येष न च कश्चिच्छृणोति मे।

धर्मादर्थश्च कामश्च स किमर्थं न सेव्यते।।

मी हात वर करून ओरडतोय की - ‘ज्या अर्थ आणि कामाच्या मागे तुम्ही धावताय ते धर्माने वागल्यामुळेच प्राप्त होतात, तर मग तुम्ही धर्माने का वागत नाही?’ - पण माझं कोणी ऐकत नाही! धर्मानुसार वागणं ही काही सोपी गोष्ट नव्हे. महाभारताच्या काळातही नव्हती. आज तर बोलायलाच नको. त्याही काळात धर्मानुसार वागण्याचा निदान प्रयत्न करणारी माणसंसुद्धा अक्षरशः एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच होती. त्या दुर्मिळ लोकांमधेही आपल्या आदर्शाशी सर्वाधिक एकनिष्ठ असलेला महाभारताचा नायक युधिष्ठिर. लोकांची टीका, पत्नी व भावंडांचा तळतळाट, ज्ञातिक्षोभच नव्हे तर ज्ञातीचा नाश पत्करूनसुद्धा ‘धर्माचा शोध' न सोडणारा ‘धर्मराज’. आज तर बहुतेकांना तो बावळट, अव्यवहारी, ‘कापुरुष’ वाटतो! काळाच्या महिम्यानुसार हे होणारच. पण प्रत्यक्ष महाभारतकारांना मात्र त्याचा हा आयुष्यभराचा शोध, त्यासाठी त्याने दिलेलं मोल, पत्करलेला रोष, सहन केलेलं अपयश, दुःख, हालअपेष्टा, हे सर्व धीरोदात्त वाटतं. त्याच्या या सगळ्या प्रवासाचा अंतिम विजय म्हणजे त्याचं सदेह स्वर्गाला जाणं. इतर कुठल्याही मनुष्याला अप्राप्य असं हे यश. त्यातही शेवटपर्यंत साथ देणार्‍या कुत्र्याचा त्याग करण्याचा त्याला दिला गेलेला आदेश, आणि तो अधर्म करण्याऐवजी आयुष्यभराच्या प्रवासाच्या फळाचं मोल देण्याचं त्याचं धाडस – त्याच्या अंतिम विजयाचं स्थान – ‘स्वर्गारोहिणी’!

आपल्या संस्कृतीतल्या इतर अनेक गोष्टींबरोबर त्यातल्या सर्वोच्च आदर्शरूप असलेल्या धर्म आणि मोक्ष या दोन्ही पुरुषार्थांचंही 'तो' असा प्रतीक आहे. काल हिमालयानं त्याच्या दिसण्याच्या पहिल्याच क्षणात दिलेला हा संस्कार... आणि म्हणून ते ‘दर्शन’... त्या बीजाचा वृक्ष होण्यासाठी त्याला आपल्या कृतीचं खत-पाणी घालण्याच्या जबाबदारीसकट दिलेलं. भगवन्तांनी गीतेत म्हंटलं आहे तसं – ‘यः पश्यति, स पश्यति’ - ज्याला दिसतं, त्याला दिसतं!  

Comments

Parag said…
सुश्रुत, लेख इतका छान झाला आहे की त्यावर comment लिहिण्याचे काम सुद्धा मला अवघड आहे. त्यामुळे फार काही न लिहिता केवळ तू लिहिलेल्या सुंदर लेखाला प्रणाम करतो.

- पराग
Nirmala Samant said…
सुश्रुत,

अप्रतिम लेख. प्रवास वर्णनावरून सुरु करून एवढे सखोल अध्यात्मिक चिंतन..खूप कौतुकास्पद.

दिसणे आणि दर्शन..
दिपवून टाकणे आणि विरघळवून टाकणे..

वा वा !! असे अनेक मास्टर पिसेस आहेत लेखात
लिहीत रहा..

-निर्मला

Popular posts from this blog

दो अंतरों के बीच में…

पीछे   रेडियो पे   गाना चल रहा है.... हाथ थे मिले की   जुल्फ   चाँद की सवार दूँ होठ   थे खुले की हर बहार को   पुकार   दूँ दर्द था दिया गया की हर दुःखी को प्यार दूँ और सांस यों की स्वर्ग भूमि पर उतार दूँ                     और   मैं   सोच रहा हूँ....                     जो यकीनन पाया उसका ,                     जो शायद पाया होगा उसका भी ,                     जो पा सकते थे... नही पाया , लेकिन उसकी   जानिब   दो कदम चले तो सही                     इसी खुशी का एहसास ,                     खुद ही खुद को , बिना-थके ,  दिलाते   रहने का ही                     जश्न मनाने के इस  ...

तुझिये निढळीं...

हे संत ज्ञानदेवांचं भजन - तुझिये निढळीं... एका प्रकट कार्यक्रमात बालगंधर्वांनी गायलेलं ध्वनिमुद्रण आहे हे.  जुनं आणि प्रकट कार्यक्रमातलं असल्यामुळे फार चांगलं नाहीये. पण त्याच्या सगळ्या बाह्य दोषांतून आणि मर्यादांतूनही त्याचं सौंदर्य आणि त्याची शक्ती दोन्ही पूर्ण प्रकट होतात हा माझा अनुभव आहे.  हे म्हणजे वेरूळच्या आजच्या भग्न मूर्तीकडे पाहावं आणि ती तिच्या मूळ स्वरूपात दिसावी तसं आहे थोडंसं... भगवंतांनी गीतेत म्हंटलं आहे - यः पश्यसि स पश्यसि - ज्याला दिसतं त्याला दिसतं.... तसं काहीसं.  ही चाल मास्तरांची... मा. कृष्णरावांची... आहे. त्यांची स्वतःची या गाण्याची उत्तम ध्वनिमुद्रण असलेली ध्वनिमुद्रिका आहे. माझ्याकडे आहे.  छान आहे.   पण हे ऐकल्यानंतर पुन्हा 'त्यांचं' ऐकावं अशी इच्छा मला झालेली नाही.  संगीतकाराने स्वतः गायलेलं गाणं हे कोणत्याही गायकाने गायलेल्या आवृत्तीपेक्षा सरस असतं म्हणतात. शंभरातल्या नव्व्याण्णव वेळा ते खरंही आहे. पण काही गायकांच्या गळ्याला अद्भुताचा, परतत्त्वाचा स्पर्श असतो. त्यातून व्यक्त होणारा आवाज त्या स्पर्शामुळे एक वेगळी अनुभूती दे...

पं. कुमार गंधर्व आणि भा. रा. तांबे

सखोल, मूलगामी  चिकित्सा; स्वतंत्र विचार; आपण जे करतो ते ‘का’ करतो याची पक्की जाणीव; कोणत्याही प्रभावापुढे डगमगून न जाता ह्या जाणिवेवर ठाम राहण्याची ‘निर्भय साधना’; आणि ह्या सर्वांबरोबर अतिशय प्रभावी, कलात्मक व सौंदर्यपूर्ण सृजन करू शकणार्‍या; अक्षरशः एका हाताच्या बोटावर मोजता येतील अशा महान कलाकारांमधे कुमारजींचा समावेश होतो. त्यांच्या सर्वस्पर्शी व्यासंगाला आणि कुतुहलाला कोणताही विषय वर्ज्य नव्हता. कुमारजींच्या प्रत्येकच प्रस्तुतीत त्यांच्या ह्या सर्वस्पर्शी व्यासंगाचे दर्शन व्हायचे. विषयवस्तूची मांडणी साकल्याने, सर्व बाजूंनी विचार करून केलेली असायची. त्यात वर्षानुवर्षे गृहित धरलेल्या विचारांना छेद देऊन, अतिशय आनंददायक असा नवा विचार देण्याचे सामर्थ्य होते. ह्या सामर्थ्यामुळेच कुमारांचे रसिकांच्या मनात एकमेवाद्वितीय असे स्थान आहे. त्यांनी लोकांसमोर मांडलेले कवी-दर्शनाचे कार्यक्रमही ह्याला अपवाद नव्हते. कुमारजींनी भारतीय परंपरेतील अनेक कवींच्या रचना रसिकांपुढे सादर केल्या. ह्यात अनेक संत-कवींचा समावेश होता. मात्र ह्या मालिकेतील प्रत्येक संत -  कबीर, मीरा, सूरदास, तुलसीदास व तुक...