हे संत ज्ञानदेवांचं भजन - तुझिये निढळीं...
एका प्रकट कार्यक्रमात बालगंधर्वांनी गायलेलं ध्वनिमुद्रण आहे हे.
जुनं आणि प्रकट कार्यक्रमातलं असल्यामुळे फार चांगलं नाहीये. पण त्याच्या सगळ्या बाह्य दोषांतून आणि मर्यादांतूनही त्याचं सौंदर्य आणि त्याची शक्ती दोन्ही पूर्ण प्रकट होतात हा माझा अनुभव आहे.
हे म्हणजे वेरूळच्या आजच्या भग्न मूर्तीकडे पाहावं आणि ती तिच्या मूळ स्वरूपात दिसावी तसं आहे थोडंसं... भगवंतांनी गीतेत म्हंटलं आहे - यः पश्यसि स पश्यसि - ज्याला दिसतं त्याला दिसतं.... तसं काहीसं.
ही चाल मास्तरांची... मा. कृष्णरावांची... आहे. त्यांची स्वतःची या गाण्याची उत्तम ध्वनिमुद्रण असलेली ध्वनिमुद्रिका आहे. माझ्याकडे आहे. छान आहे.
पण हे ऐकल्यानंतर पुन्हा 'त्यांचं' ऐकावं अशी इच्छा मला झालेली नाही.
संगीतकाराने स्वतः गायलेलं गाणं हे कोणत्याही गायकाने गायलेल्या आवृत्तीपेक्षा सरस असतं म्हणतात. शंभरातल्या नव्व्याण्णव वेळा ते खरंही आहे. पण काही गायकांच्या गळ्याला अद्भुताचा, परतत्त्वाचा स्पर्श असतो. त्यातून व्यक्त होणारा आवाज त्या स्पर्शामुळे एक वेगळी अनुभूती देऊन जातो. पंकज मलिकांनी संगीतबद्ध केलेली काही गीतही अशी त्यांच्या स्वतःच्या आवाजात उपलब्ध आहेत, आणि तीच कुंदनलाल सैगल यांनीही गायलेली आहेत.
उदाहरणार्थ... ऐ क़ातिब-ए-तक़दीर मुझे इतना बता दे
आणि स्वतः संगीतकार पंकज मलिक यांनी गायलेलं...
एका बाजूला कलेचा, निर्मितीचा दैवी स्रोत, आणि दुसरीकडे श्रोते, यांच्यामध्ये असलेला कलाकार. तो कलाकार जर पूर्णपणे अहंकारशून्य आणि अभिनिवेशविहीन झाला, तर जी कला श्रोत्यांपर्यंत पोहोचते, ती अत्यंत सात्त्विक असते अशी माझी धारणा आहे आणि अनुभवही आहे.
प्रत्यक्ष ज्ञानदेवांच्या स्वतःच्या रचनांमध्ये हा अनुभव मला इतर कुठल्याही निर्मितीपेक्षा सर्वाधिक येतो. गाण्यामध्ये बालगंधर्व आणि कुंदनलाल सैगल इतकं यांच्याइतजे, याच्याजवळ जाऊ शकणारे दुसरे गायक सापडणं अवघड आहे.
व्यक्त होण्याच्या या काळात, "स्वतःची अभिव्यक्ती" ही कलाकाराची शक्ती, प्रेरणा मानली जाणं स्वाभाविक आहे. त्यातून निर्माण होणारी कलाही श्रेष्ठ असू शकतेच. पण त्या कलेच्या निर्मितीसाठी, आणि तिच्या आस्वादासाठीही, बुद्धीचा, विचाराच, एक झिरझिरीत का होईना पदर असावाच लागतो.
पण त्या निर्मितीमागे "व्यक्त होण्यापेक्षा" जर समर्पणाची भावना असेल, त्या अभिव्यक्तीच्या प्रेरणेमागे असलेला अहंकार जर पूर्णपणे विसर्जित करता आला, तर जी कलेची निर्मिती होते, ती अत्यंत वेगळ्या पातळीची होती. सात्त्विक होते.
किमान अशी माझी धारणा आहे.

Comments