Skip to main content

मृत्यूचा मृत्यू


लता गेली.

पण म्हणजे नेमकं काय झालं?

तिची गाणी, त्यातून तिने निर्माण केलेलं विश्व तसच आहे ना? ते कुठेच गेलं नाहीए. जाणारही नाहीए. हवी तेव्हा ती गाणी ऐकता येणारच आहेत की? त्यात तिचा तोच सूर, तीच आर्तता, तोच नेमकेपणा, तीच जादू, तेच संगीत, तोच नॉस्टॅल्जिया असणार आहे.

तिची ‘नवीन’ गाणी ऐकायला मिळणार नाहीत म्हणायची तर तिने गाणं थांबवून आता उणीपुरी वीस वर्षं होत आली होती. म्हणजे तिच्या जाण्याने नवीन चांगली गाणी आता येणार नाहीत असंही नाही.

बरं, वैयक्तिक ऋणानुबंध म्हणाल तर तोही नाही. प्रत्यक्ष परिचय नाही. कधी कुठे एकत्र काम केलय असही नाही.

मग लता ‘गेली’ म्हणजे नेमकं काय झालं?

ही बातमी ऐकल्यावर नि:शब्द, सुन्न होण्यासारखं नेमकं काय घडलंय?

तिच्या जीर्ण झालेलं शरीरानं आणखी किती वर्षं तग धरायला हवा होता? ‘वासांसि जीर्णानि...’ हे तिच्या बाबतीत खरं नाही का?

की कुणाच्याही मृत्यूने होते तशी आपल्या स्वत:च्या मर्त्यपणाची जाणीव याही मृत्यूने आपल्याला झाली इतकंच?

❖❖❖

इयत्ता नववीत असताना मी व मा‍झ्या आतेभावाने जुनी गाणी ऐकायला व जमवायला सुरुवात केली. तेव्हापासून पुढची अनेक वर्षे, अनेक संग्राहकांकडे गेलो. विनवण्या करून, उधार घेऊन, भीक मागून, गाठीला पैसे असतीलच तर विकत घेऊन, मिळतील तशी गाणी ऐकली. दिवसाचे दहा-दहा बारा-बारा तास ऐकली. यात खूप संगीतकार, गायक, गीतकार नव्याने कळले, ऐकायला मिळाले. ‘ती’ यात होतीच, पण नव्याने नाही - ती आधीपासून होतीच.

कोणताही हिंदू रामायण-महाभारत ‘पहिल्यांदा’ वाचत नाही असं म्हणतात. पुस्तक-रूपाने ते हातात येण्याआधी आपल्याला त्याची कथा, त्यातली पात्रे माहिती झालेलीच असतात. लताचा आवाज ऐकण्याचंही तसंच. टेपच्या, ध्वनिमुद्रिकेच्या रूपाने तो हातात येण्याआधी तो माहिती झालेलाच असतो. लताला कोणीच ‘पहिल्यांदा’ ऐकत नाही. ती असतेच...

या सगळ्या धडपडीत तिची खूप नवी-जुनी गाणी मात्र सापडली. म्हणजे गाणी जुनीच, आम्ही नव्याने ऐकत असलेली. ग़ुलाम हैदरचं ‘बेदर्द तेरे दर्द को सीनेसे लगाके’, के दत्तांचं ‘बेदर्द जमानेसे शिकवा न शिकायत है’, सरदार मलिकचं ‘हुई ये हम से नादानी तेरी महफिल मे आ बैठे’, पं अमरनाथांचं ‘जोगियासे प्रीत किए दुख होये’, विनोदचं ‘मेरी उल्फत सोयी है यहाँ’.. अशी कैक. आम्ही वेड्यासारखे ऐकत होतो.

ती होतीच. आणखी खोल खोल होत गेली.

❖❖❖

असेच एकेक संगीतकार सापडले – अनिलदा, रोशन, सी रामचंद्र, श्यामसुंदर, सज्जाद, हुस्नलाल भगतराम, ग़ुलाम मुहम्मद, मदनमोहन, हेमंत कुमार, जयदेव, खय्याम, सुधीर फडके, चित्रगुप्त, एस एन त्रिपाठी – नौशाद, एसडी, शंकर जयकिशन होतेच.

या सगळ्यात ‘ती’ होतीच. या सगळ्या दिग्गजांच्या दिग्विजयी प्रतिभा जणू जिची आराधना करतात ती त्यांच्या प्रतिभेची प्रिया.. जिच्याशिवाय एकमेकांच्या अस्तित्वाला अर्थच राहात नाही असे अन्योन्य.

आम्ही तिला गृहीतच धरलं होतं. नंतर जुन्या, म्हणजे प्लेबॅक-पूर्व काळातल्या अभिनेत्री-गायिका ऐकल्यानंतर ही बाई किती सुरात गाते हे जाणवलं. म्हणजे, खरं तर, ही काहीतरी ‘वेगळी’ आहे इतकचं जाणवलं. सूर वगैरे कळत नव्हतेच. पण हिच्यावाचून काही गंमत नाही, अर्थ नाही हे कळलं.

ती आणखी खोल जात राहिली.

❖❖❖

आता तर ती अस्तित्वाचाच भाग बनून गेली आहे. तिच्या अस्तित्वाची वेगळी जाणीवही होत नाही. रक्तात तांबड्या पेशी, पांढर्‍या पेशी असतात, तशीच ‘लता’ पण असते थोडी. तांबड्या पांढर्‍या पेशींचा कुठे विचार करतो आपण जाणीवपूर्वक? मग तिचा तरी कशाला करावा?

❖❖❖

कधीतरी एकदा, बहुधा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सवाच्या शताब्दीच्या महोत्सवात ती आली होती. कार्यक्रम वेगळ्या कुणाचा होता. पण लोकांनी फारच आग्रह केला म्हणून ती फक्त पसायदान गाणार होती. मी फोटो काढायला म्हणून स्टेजच्या अगदी समोरच बसलो होतो. कसेबसे पैसे वाचवून आणलेला रोल. त्यातले चार-पाच फोटो खास तिच्यासाठी म्हणून शिल्लक ठेवले होते. पण ती गायला लागली अन् मी वेड्यासारखा, भान विसरून तिच्याकडे बघतच बसलो. डोळ्यात पाणी असावं – बहुतेक पाणीच – पण त्याच्यापुढे चाललेल्या चित्रपटात ते ही दिसत नव्हतं. बरसात – अनोखा प्यार - अंदाज – महल – तराना - अलबेला – आवारा - अनारकली – नागिन – पतिता – आह – दो बिघा जमीन पासून सगळी मालिका, सगळे चित्रपट – म्हणजे त्यातली गाणी -  माझ्या डोळ्यातल्या पाण्याच्या पडद्यावर उमटत होती. हिनी – या आपल्यासमोर आठ-दहा फुटांवर बसलेल्या बाईने गायली आहेत ही गाणी! आणि ती आत्ता इथे माझ्यासमोर ....

किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनी तिहीं लोकीं ...

संपत आलं पसायदान. कसाबसा भानावर येत मी फोटो काढले. पण त्याआधी माझ्या डोळ्यासमोर दिसलेल्या चित्रपटाने ती माझी कोण याचं चित्र स्पष्ट करून टाकलं होतं. फोटो असेच. जनरीत, लोकोपचार म्हणून.

❖❖❖

अशा किती आठवणी, किती प्रसंग? किती वेळा तिच्या सुरांनी आनंद द्विगुणित केलाय, साजरा केलाय, सांत्वन केलय, आधार दिलाय, सावरून धरलंय? आणि हे सगळं नकळत. वसंत ऋतुत निसर्गाला आलेल्या बहरासारखं. तो असतोच पण जाणवत नाही. जाणवतो फक्त त्याचा परिणाम. रक्तातल्या पेशींसारखं... त्या असतातच... तीही असतेच – होतीच – असणारचं.

❖❖❖

असणारच?

पण आज तर ती नाही? असं असू शकतं असं कधी मनातच आलं नाही. हे समीकरण शक्यतेच्या कक्षेत कधी येईल असंच वाटलं नाही. आपल्या रक्ताचा, अस्तित्वाचा एक भाग एकदम नाहीसाच झाला तर? अस होऊ शकेल अस का कधी कुणाला वाटेल?

तसंच हे काहीसं.

पण हे झालंय आज तिच्या जाण्यानं. ती गेली म्हणजे ‘हे’ झालं.

तिच्या जाण्याने मला माझ्या मर्त्यपणाची जाणीव झाली ती अशी. म्हणजे माणूस मर्त्य आहे, मी माणूस आहे, म्हणून मीपण कधीतरी मरणार आहे असल्या सार्वत्रिक, सॉक्रेटिसी ज्ञानाची जाणीव नाही. तर थोडासा मीही तिच्याबरोबर आज मरून गेलो आहे, या अत्यंत आत्ममग्न वास्तवाची जाणीव.

पण या घटनेच्या आघाताच्या ताजेपणातून बाहेर पडल्यावर जाणवते आहे, की ती आहेच. तिच्या गाण्यांमधून, तिच्या गाण्यांचा जो अंश मा‍झ्यात समाविष्ट झाला आहे त्यात ती आहेच. निदान ती ज्यांच्या रक्ताचा, अस्तित्वाचा भाग आहे अशी पिढी जिवंत असेपर्यंत तरी ती राहीलच.

म्हणजे आज दिनांक सहा फेब्रुवारी रोजी जो मृत्यू झाला तो तिचा नाहीच. आजचा मृत्यू तिच्या मृत्यूचा.

गेला तो.

ती आहेच.

❖❖❖

Comments

Popular posts from this blog

दो अंतरों के बीच में…

पीछे   रेडियो पे   गाना चल रहा है.... हाथ थे मिले की   जुल्फ   चाँद की सवार दूँ होठ   थे खुले की हर बहार को   पुकार   दूँ दर्द था दिया गया की हर दुःखी को प्यार दूँ और सांस यों की स्वर्ग भूमि पर उतार दूँ                     और   मैं   सोच रहा हूँ....                     जो यकीनन पाया उसका ,                     जो शायद पाया होगा उसका भी ,                     जो पा सकते थे... नही पाया , लेकिन उसकी   जानिब   दो कदम चले तो सही                     इसी खुशी का एहसास ,                     खुद ही खुद को , बिना-थके ,  दिलाते   रहने का ही                     जश्न मनाने के इस  ...

तुझिये निढळीं...

हे संत ज्ञानदेवांचं भजन - तुझिये निढळीं... एका प्रकट कार्यक्रमात बालगंधर्वांनी गायलेलं ध्वनिमुद्रण आहे हे.  जुनं आणि प्रकट कार्यक्रमातलं असल्यामुळे फार चांगलं नाहीये. पण त्याच्या सगळ्या बाह्य दोषांतून आणि मर्यादांतूनही त्याचं सौंदर्य आणि त्याची शक्ती दोन्ही पूर्ण प्रकट होतात हा माझा अनुभव आहे.  हे म्हणजे वेरूळच्या आजच्या भग्न मूर्तीकडे पाहावं आणि ती तिच्या मूळ स्वरूपात दिसावी तसं आहे थोडंसं... भगवंतांनी गीतेत म्हंटलं आहे - यः पश्यसि स पश्यसि - ज्याला दिसतं त्याला दिसतं.... तसं काहीसं.  ही चाल मास्तरांची... मा. कृष्णरावांची... आहे. त्यांची स्वतःची या गाण्याची उत्तम ध्वनिमुद्रण असलेली ध्वनिमुद्रिका आहे. माझ्याकडे आहे.  छान आहे.   पण हे ऐकल्यानंतर पुन्हा 'त्यांचं' ऐकावं अशी इच्छा मला झालेली नाही.  संगीतकाराने स्वतः गायलेलं गाणं हे कोणत्याही गायकाने गायलेल्या आवृत्तीपेक्षा सरस असतं म्हणतात. शंभरातल्या नव्व्याण्णव वेळा ते खरंही आहे. पण काही गायकांच्या गळ्याला अद्भुताचा, परतत्त्वाचा स्पर्श असतो. त्यातून व्यक्त होणारा आवाज त्या स्पर्शामुळे एक वेगळी अनुभूती दे...

पं. कुमार गंधर्व आणि भा. रा. तांबे

सखोल, मूलगामी  चिकित्सा; स्वतंत्र विचार; आपण जे करतो ते ‘का’ करतो याची पक्की जाणीव; कोणत्याही प्रभावापुढे डगमगून न जाता ह्या जाणिवेवर ठाम राहण्याची ‘निर्भय साधना’; आणि ह्या सर्वांबरोबर अतिशय प्रभावी, कलात्मक व सौंदर्यपूर्ण सृजन करू शकणार्‍या; अक्षरशः एका हाताच्या बोटावर मोजता येतील अशा महान कलाकारांमधे कुमारजींचा समावेश होतो. त्यांच्या सर्वस्पर्शी व्यासंगाला आणि कुतुहलाला कोणताही विषय वर्ज्य नव्हता. कुमारजींच्या प्रत्येकच प्रस्तुतीत त्यांच्या ह्या सर्वस्पर्शी व्यासंगाचे दर्शन व्हायचे. विषयवस्तूची मांडणी साकल्याने, सर्व बाजूंनी विचार करून केलेली असायची. त्यात वर्षानुवर्षे गृहित धरलेल्या विचारांना छेद देऊन, अतिशय आनंददायक असा नवा विचार देण्याचे सामर्थ्य होते. ह्या सामर्थ्यामुळेच कुमारांचे रसिकांच्या मनात एकमेवाद्वितीय असे स्थान आहे. त्यांनी लोकांसमोर मांडलेले कवी-दर्शनाचे कार्यक्रमही ह्याला अपवाद नव्हते. कुमारजींनी भारतीय परंपरेतील अनेक कवींच्या रचना रसिकांपुढे सादर केल्या. ह्यात अनेक संत-कवींचा समावेश होता. मात्र ह्या मालिकेतील प्रत्येक संत -  कबीर, मीरा, सूरदास, तुलसीदास व तुक...