Skip to main content

वारसा

एअरपोर्टला जाण्यासाठीची टॅक्सी आत्ता तासभरात येईल. तू खरंच ‘आत्ता’ तिला भेटायला जाणार आहेस का?”  

मी तसा महिन्याभरातच परत येण्याच्या हिशोबानी प्रवासाला निघालो होतो. त्यामुळे अगदी तातडीनं तिला आजच भेटण्याची काही आवश्यकता होतीच असं नाही. तिचं वय खूप झालं होतं, ती थकली होती, हे खरंच.. पण मग काय झालं, महिनाभरानी भेटूच असं म्हणता आलं असतं. पण त्या दिवशी का कुणास ठाऊक, मला असं वाटलं की जाऊन यावंच. तिला भेटलो. पाऊण-एक तास छान गप्पा झाल्या. नेहमीच व्हायच्या. तिला माझ्याबद्दल असलेली माया, प्रेम, कौतुक विलक्षण होतं. ती मायाळू होतीच आणि मलाही मागच्या पिढीबद्दल खूप भावनिक जवळीक वाटते, पण त्याही पलीकडे जाऊन आम्हाला एकमेकांबद्दल वाटणारी जवळीक विलक्षण होती. आमच्या त्या शेवटच्या भेटीला उणेपुरे दोन आठवडेही झाले नसतील आणि काल ती गेली. त्या दिवशी तिला भेटायला जायची मला झालेली तीव्र जाणीव ही जणू काही नियतीच्या अटळ पावलांची माझ्या हितकर्त्या देवतांनी मला दिलेली पूर्वसूचनाच होती असं आता म्हणायला पाहिजे.

माझ्या वडीलांची मोठी बहीण. त्यांच्या पिढीतल्या सहा भावंडांपैकी शेवटची शिल्लक असलेली सिंधुआत्या काल गेली. चढउतारांनी, यशापयशानी भरलेलं, कष्टाचं पण आत्मसन्मानाचं असं शहाण्णव वर्षांचं दीर्घ आयुष्य जगून, एकूणात समाधानाने, शांतपणे गेली.  

एक पिढी संपली.

त्या पिढीचं आमच्या डोक्यावर असलेल्या छत्र, कवच गेलं. आता आम्ही युद्ध-रेखेवर!

आपल्या लहानपणाशी  असलेला शेवटचा धागा संपून गेल्यानंतर माणसाच्या मनाची काय अवस्था होते हे तो अनुभव प्रत्यक्ष घेतल्याशिवाय कळणं कठीण आहे. हे वाक्य इतर सगळ्यांप्रमाणे केवळ भावनिक पद्धतीने म्हणणं शक्य आहे. आणि ते प्रत्येकाच्या बाबतीत खरंही असतंच. कुठल्याही महाकाव्यातल्या नायक-नायिकेच्या प्रेमाइतकंच सामान्य आयुष्यातल्या स्त्री पुरुषांचे प्रेमही खरंच असतं. पण केवळ तेवढ्याच ढोबळ अर्थानं मी हे  म्हणत नाहीये.

आपल्या मागची पिढी कशी जगते हा आपल्यासाठी नुसता एक आदर्श असतो असं नाही तर खूप वेळेला त्यात आपल्या स्वतःच्या भविष्याचं ‘पूर्वबिंब’ दिसतं. त्यांचा वारसा आपल्यामध्ये असल्यामुळे,  त्यांचं रक्त आपल्यात वाहात असल्यामुळे,  त्यांचे संस्कार आपल्यावर असल्यामुळे, खूप वेळा आपलं म्हातारपण कसं असणार आहे याची काही प्रमाणात एक पूर्वावृत्ती आपल्याला त्यांच्या म्हातारपणात बघायला मिळते. त्यांच्या आणि आपल्या आयुष्याची परिप्रेक्ष्य वेगळी असतात, संदर्भ वेगळे असतात, त्यांना आणि आपल्याला आलेल्या अडचणी, मिळालेल्या संधी, आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा हे सगळं वेगवेगळं असतं. पण एका दृष्टीने पाहिलं तर नसतं पण.

आपण जर जाणीवपूर्वक काही वेगळं करायचा प्रयत्न केला नाही तर आपल्या आयुष्यातल्या तात्कालिक प्रभावांना, प्रवाहांना तोंड देण्याची आपली स्वभावप्रवृत्ती काय असणार आहे, त्या तोंड देण्यामध्ये धैर्याचं, आत्मसन्मानाचं, आत्मविश्वासाचं, श्रद्धेचं, मूल्यांचं, प्रेमाचं, सोशिकपणाचं, त्यागाचं, तसंच तर्काचं, व्यवहाराचं, स्वार्थाचं, अहंकाराचं, हट्टाचं स्थान काय असणार आहे याची पूर्वसूचना आपल्याला मागच्या पिढीच्या जगण्यातून मिळत असतें. यातलं काय घ्यायचं, आणि काय सोडायचं हा आपला प्रश्न. मागची पिढी गेली की हे मार्गदर्शन संपून जात. आपण युद्ध-रेखेवर येतो. लपायची जागा संपते.

चार वर्षांपूर्वी आई गेली. अशीच, सत्याऐंशी वर्षांचं समाधानी आयुष्य जगून, स्वतःच्या घरात, जिवलग माणसं भोवती असताना, आणि तरीही अत्यंत अलिप्तपणे मरण पावली. आयुष्यभर अत्यंत मनोभावे प्रभू रामचंद्राची उपासना करणारी ती, शेवटचा जवळजवळ संपूर्ण महिना, संसारातून मन काढून घेऊन, फक्त रामनामाचा जप करत होती, आणि जप करता-करताच शांत झाली. माझी आत्याही श्रीगजानन महाराजांची अत्यंत निष्ठेने उपासना करणारी, त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून, ‘ते माझी काळजी घेतीलच आणि माझी गती उत्तमच होणार’ या विश्वासात, वयाच्या शहाण्णवाव्या वर्षी मरण पावली. काही वर्षांपूर्वी मरण पावलेली सुमनआत्याही अशीच.

ईश्वरावर अढळ श्रद्धा आणि तरीही स्वतःच्या प्रयत्नात, कष्टात कुठेही कमी पडू न देता, लौकिकार्थाने चारचौघींसारखीच, आणि जवळून समजावून घेतलं तर त्या चारचौघीतल्या प्रत्येकीसारखंच विलक्षण आयुष्य जगलेल्या या मागच्या पिढीतल्या बायका. त्यांचं जगणं समृद्ध होतं, तसंच त्यांच मरणंही. त्यांचं जगणं आपल्याला आपल्या वारश्याची जाणीव करून देतंच, पण विशेषतः स्वतःलाच ‘कृतान्तकटकामलध्वज-जरा दिसो’ लागल्यानंतर त्यांचं मरण, ज्या धैर्याने, समंजसपणे, श्रद्धेने त्या त्याला सामोर्‍या गेल्या, हे मला एका अर्थाने माझ्या स्वतःच्या शेवटच्या काळाच्या संदर्भात फार बळ देऊन जातं. असं वाटतं की या पद्धतीचे मरण येऊ शकेल असे संस्कार जर आपल्यावर असतील, जर आपण त्याची बूज राखू शकलो, योग्य त्या मार्गाने वाटचाल केली, तर आपणही अश्या धैर्याने, समंजसपणे, आणि देव करो अन् – श्रद्धेने त्या घटकेला सामोरे जाऊ शकू - असा विश्वास निर्माण होतो. तो देणार्‍या या मागच्या पिढीतल्या बायकांच्या ऋणातून मी कधीही उतराई होऊ शकेन असं वाटत नाही.

आधुनिक शिक्षणपद्धतीने केलेल्या ब्रेनवॉशिंग मध्ये वाढलेला मी - विज्ञानाच्या प्रभावाखाली श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांना एकच मानत मोठा झालो. नंतरच्या काळात ‘श्रद्धा’ या गोष्टीचं महत्त्व, खरं तर तिच्या अभावामुळेच, प्रकर्षानं जाणवायला लागलं. अशा परिस्थितीत जेव्हा जाणीवपूर्वक याचा विचार व्हायला लागला तेव्हा माझ्या मागच्या पिढीतल्या स्त्रियांची समोर ‘बघत’ असलेली आयुष्यं ‘दिसायला’ लागली. शेकडो पुस्तकं वाचूनही न कळू शकणारी ‘श्रद्धा’ म्हणजे काय ती त्यांच्या जगण्यातून बघायला मिळाली. अजूनही ती श्रद्धा मनात निर्माण झाली आहे असं म्हणायला जीभ धजतच नाही. पण काही प्रमाणात निदान त्या मार्गावर पावलं टाकायला सुरूवात झाली इतकं म्हणणं शक्य आहे, आणि ती झाली याला त्यांचाच वारसा, त्यांचेच संस्कार कारणीभूत आहेत.

स्वतःच्या प्रयत्नात कुठेही कसूर न करता,  सतत कष्ट करत राहणार्‍याच्या आयुष्यातसुद्धा श्रद्धेला स्थान असतं - किंबहुना अश्या आयुष्यात श्रद्धेला अधिक उत्कट स्थान असतं, ही जाणीवही  त्यांची आयुष्यं पाहूनच झाली. स्वतःच्या प्रयत्नांनी मिळवलेल्या गोष्टींबरोबर येणारा अहंकार घालवण्याची, अत्यंत विनम्र भावनेनं आयुष्याला सामोरं जाण्याची क्षमता या श्रद्धेमुळे निर्माण होते याचा वस्तुपाठ मिळाला. मागच्या पिढीतल्या सर्व स्त्रिया अत्यंत धार्मिक होत्या किंवा ‘निष्कामकर्मभावनेने’ जगणार्‍या होत्या, त्यांना संसाराची आसक्ती नव्हतीच असं मी मुळीच म्हणत नाहीये. मात्र आयुष्याला, त्या आसक्तीच्या पलीकडे जाऊन, काही तरी उद्दिष्ट असावं ही जाणीव मात्र त्यांना होती. किमान माझ्या आयुष्यात आलेल्या या स्त्रियांना तरी होती. आपण जे करतोय ते ईश्वराला अर्पण करण्याच्या भावनेने करणे हा निदान एक आदर्श म्हणून का होईना समोर ठेवून जगणं फार मोलाचं आहे ही जाणीव त्यांच्या आयुष्यांच्या उदाहरणांमुळे मला मिळाली. अधिकाधिक निरर्थक, हिंसक, कोरड्या, पोकळ होत चाललेल्या या जगात आपल्या जगण्यामध्ये एक ओलावा निर्माण करण्याचं सामर्थ्य या श्रद्धेत आहे. आणि ती जाणीव त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवली यासाठी मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे.

आयुष्याला सामोरं जाण्याची विशिष्ट वृत्ती आणि ईश्वरावरची अढळ श्रद्धा यांच्याबरोबर या स्त्रियांकडून मिळालेला आणखी एक वारसा म्हणजे आपल्या परंपरेबरोबर असलेलं आपलं नातं. हे नातं भाषेशी, साहित्याशी जुळलेलं असतं. एका नाण्याच्या दोन बाजू असाव्यात त्याप्रमाणे. मला आणि माझ्या भावाला हट्टाने मराठी माध्यमाच्या शाळेत घालणारी माझी आई, आणि वयाच्या शहाण्णवाव्या वर्षीसुद्धा ज्ञानदेव, तुकारामांपासून रघुनाथ पंडित, वामन पंडित ते कुसुमाग्रजांपर्यंतच्या कविता धडाधडा म्हणून दाखवणारी, अलौकिक स्मरणशक्ती असलेली माझी सिंधुआत्या. भाषा आणि साहित्याबरोबर त्यांनी माझं जे नातं, न कळत्या वयातच निर्माण करून दिलं त्या नात्याच्या मार्गानीच परंपरेतल्या तत्त्वज्ञान, अध्यात्म वगैरे गोष्टींची माझी ओळख होऊ शकली. असं म्हणतात की कोणताही  हिंदू रामायण-महाभारत ‘पहिल्यांदा’ कधीच वाचत नाही! कारण आपण ते पुस्तक रूपाने कधीही हातात घेतलं, कितव्याही वर्षी का असेना, तरीसुद्धा त्यावेळेला ते कथानक आपल्याला आजी-आजोबांकडून, आई-वडिलांकडून, मागच्या पिढीकडून माहिती झालेलंच असतं! हे संस्कार माझ्यावर करणारी, त्यातही मराठी साहित्याचा, आणि विशेषतः मराठी कवितेचा, माझ्या आयुष्यात प्रवेश करून देणारी जी माणसं होती, त्यांच्यात माझ्या वडिलांचा आणि सिंधुआत्याचा फार मोठा वाटा आहे.  फार समृद्ध केलं त्यांनी मला. त्याच्याच बरोबर पाठांतराचं महत्त्व आणि रहस्यही त्यांनी दाखवून दिलं.‘पुस्तकस्था तु या विद्या’ ती उपयोगाची नाही हे खरंच, पण तिच्यावर प्रेम केल्याशिवाय ती सहज मुखोद्गत होत नाही हे ही खरंच. रट्टा मारून परीक्षेसाठी घोकलेल्या कविता वयाच्या शहाण्णवाव्या वर्षी स्मरत नाहीत! त्यासाठी कवितेवर प्रेमच करावं लागतं. भाषेवर, कवितेवर, साहित्यावर, आणि पर्यायाने विद्येवर, ‘शिकण्या’वर प्रेम करावं लागतं ही जाणीव हा त्या वारश्याचा मोलाचा भाग आहे.

ऑस्कर वाइल्डच्या ‘इपॉर्ट्न्स ऑफ बीइंग अर्नेस्ट’ या नाटकात आल्गेरॉनच्या तोंडी एक विदग्धोक्ति आहे -  ‘प्रत्येक स्त्री तिच्या आईसारखीच होते, हे तिचं दुर्दैव, आणि कोणताच पुरुष त्याच्या आईसारखा होत नाही – हे त्याचं!’  त्यातल्या पहिल्या भागातला कृष्णविनोद बाजूला ठेवून असं म्हणावसं वाटतं की अश्या विलक्षण स्त्रियांचा वारसा मागच्या पिढीत असताना आपल्यावर तरी हे दुर्दैव ओढवू नये. काही अंशी का होईना या स्त्रियांसारखं होता यावं अशीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना! 

असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्माऽमृतङ्गमय । 

शुभास्ते पन्थानः सन्तु  - सिन्धुआत्या ! 

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः । 

Comments

Popular posts from this blog

तुझिये निढळीं...

हे संत ज्ञानदेवांचं भजन - तुझिये निढळीं... एका प्रकट कार्यक्रमात बालगंधर्वांनी गायलेलं ध्वनिमुद्रण आहे हे.  जुनं आणि प्रकट कार्यक्रमातलं असल्यामुळे फार चांगलं नाहीये. पण त्याच्या सगळ्या बाह्य दोषांतून आणि मर्यादांतूनही त्याचं सौंदर्य आणि त्याची शक्ती दोन्ही पूर्ण प्रकट होतात हा माझा अनुभव आहे.  हे म्हणजे वेरूळच्या आजच्या भग्न मूर्तीकडे पाहावं आणि ती तिच्या मूळ स्वरूपात दिसावी तसं आहे थोडंसं... भगवंतांनी गीतेत म्हंटलं आहे - यः पश्यसि स पश्यसि - ज्याला दिसतं त्याला दिसतं.... तसं काहीसं.  ही चाल मास्तरांची... मा. कृष्णरावांची... आहे. त्यांची स्वतःची या गाण्याची उत्तम ध्वनिमुद्रण असलेली ध्वनिमुद्रिका आहे. माझ्याकडे आहे.  छान आहे.   पण हे ऐकल्यानंतर पुन्हा 'त्यांचं' ऐकावं अशी इच्छा मला झालेली नाही.  संगीतकाराने स्वतः गायलेलं गाणं हे कोणत्याही गायकाने गायलेल्या आवृत्तीपेक्षा सरस असतं म्हणतात. शंभरातल्या नव्व्याण्णव वेळा ते खरंही आहे. पण काही गायकांच्या गळ्याला अद्भुताचा, परतत्त्वाचा स्पर्श असतो. त्यातून व्यक्त होणारा आवाज त्या स्पर्शामुळे एक वेगळी अनुभूती दे...

पं. कुमार गंधर्व आणि भा. रा. तांबे

सखोल, मूलगामी  चिकित्सा; स्वतंत्र विचार; आपण जे करतो ते ‘का’ करतो याची पक्की जाणीव; कोणत्याही प्रभावापुढे डगमगून न जाता ह्या जाणिवेवर ठाम राहण्याची ‘निर्भय साधना’; आणि ह्या सर्वांबरोबर अतिशय प्रभावी, कलात्मक व सौंदर्यपूर्ण सृजन करू शकणार्‍या; अक्षरशः एका हाताच्या बोटावर मोजता येतील अशा महान कलाकारांमधे कुमारजींचा समावेश होतो. त्यांच्या सर्वस्पर्शी व्यासंगाला आणि कुतुहलाला कोणताही विषय वर्ज्य नव्हता. कुमारजींच्या प्रत्येकच प्रस्तुतीत त्यांच्या ह्या सर्वस्पर्शी व्यासंगाचे दर्शन व्हायचे. विषयवस्तूची मांडणी साकल्याने, सर्व बाजूंनी विचार करून केलेली असायची. त्यात वर्षानुवर्षे गृहित धरलेल्या विचारांना छेद देऊन, अतिशय आनंददायक असा नवा विचार देण्याचे सामर्थ्य होते. ह्या सामर्थ्यामुळेच कुमारांचे रसिकांच्या मनात एकमेवाद्वितीय असे स्थान आहे. त्यांनी लोकांसमोर मांडलेले कवी-दर्शनाचे कार्यक्रमही ह्याला अपवाद नव्हते. कुमारजींनी भारतीय परंपरेतील अनेक कवींच्या रचना रसिकांपुढे सादर केल्या. ह्यात अनेक संत-कवींचा समावेश होता. मात्र ह्या मालिकेतील प्रत्येक संत -  कबीर, मीरा, सूरदास, तुलसीदास व तुक...