Skip to main content

घालिन लोटांगण...

"घालिन लोटांगण वंदीन चरण" ही प्रार्थना आपण गणेशोत्सवात आरतीनंतर नित्यनेमाने म्हणतो. या प्रार्थनेमध्ये पाच वेगवेगळी कडवी समाविष्ट आहेत.  त्यातील एक मराठी आहे  व इतर चार संस्कृतात आहेत. यातल्या प्रत्येक कडव्याचा स्रोत वेगवेगळा आहे. मात्र  पुष्कळांना ही कडवी किंवा हे श्लोक मूळ कुठून आलेले आहेत किंवा ते कोणी रचले आहेत याची माहिती नसते. 
    यासाठीच, त्या पाचही कडव्यांच्या स्रोतांची जी काही माहिती मला उपलब्ध आहे, ती देण्याचा या पोस्टमध्ये प्रयत्न केलेला आहे. या कडव्यांच्या मूळ स्रोताच्या पुस्तकातल्या पानांची छायाचित्रेही मी दिलेली आहेत, की जेणेकरून त्या श्लोकाच्या आसपासचा काही संदर्भही वाचकांना उपलब्ध होऊ शकेल. पुस्तकांचे संदर्भही शेवटी दिलेले आहेत. 

१. घालिन लोटांगण...

घालिन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी  पाहीन  रूप  तुझे ॥
प्रेमे  आलिंगिन  आनंदें पूजिन ।
भावें  ओवाळिन  म्हणे नामा ॥
हे पहिलं कडवं हा संतश्रेष्ठ श्रीनामदेवरायांचा अभंग आहे. 
    श्री कानडे व श्री नगरकरांनी संपादित केलेल्या चिकित्सक सार्थ गाथेत तो क्र. १२५५ ला दिलेला आहे. अर्थ स्पष्ट आहे. यातल्या दुसर्‍या चरणात आपण म्हणताना बदल केलेला आहे. 'डोळ्यांनी सहित' या प्रयोगाचे आपण 'डोळ्यांनी पाहिन' असे सोपे रूप केले आहे.  

२. त्वमेव माता च पिता त्वमेव...

त्वमेव माता च पिता त्वमेव ।
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ॥
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । 
त्वमेव सर्वं मम देव देव ॥
हे दुसरं कडवं हा पांडवगीतेतील श्लोक आहे. 
    श्रीमद्भगवद्गीतेमुळे प्रभावित अश्या, स्वतःचा 'गीता' असा उल्लेख करणार्‍या, अनेक रचना आहेत. यापैकीच 'पांडवगीता' ही एक रचना. महाभारतातील विविध पात्रे कृष्णाची स्तुती करतात अशा पद्धतीने त्याची रचना केलेली आहे. मात्र यातील बहुतांश श्लोक हे मूळ महाभारतातले नाहीत. त्या स्वतंत्र रचना आहेत. यातच गांधारीच्या तोंडी असलेला  हा श्लोक आहे (श्लोक क्रमांक २८). 
    हा श्लोक गुरुस्तोत्राच्या शेवटीही म्हंटला जातो, पण तो त्या स्तोत्राचा भाग नाही. तसेच त्या स्तोत्राची, व पर्यायाने या श्लोकाची रचना आद्य शङ्कराचार्यांची आहे असं सांगितलं जातं. ते ही खरं नाही. आद्य शंकराचार्यांची गुर्वाष्टक नावाची रचना आहे पण ती गुरुस्तोत्रापेक्षा निराळी आहे. 

३. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा...

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा ।
बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् ॥ 
करोमि  यद्यत्सकलं परस्मै ।
नारायणायेति समर्पयामि ॥
हे तिसरे कडवे, हा श्रीमद्भागवताच्या ११व्या स्कंधातील, दुसर्‍या अध्यायातील ३६ वा श्लोक आहे. त्यात आपण म्हणताना थोडा बदल केलेला आहे.  मूळ श्लोक पुढीलप्रमाणे आहे - 
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वानुसृतस्वभावात् ।
करोति यद्यत्सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्तत् ।।
श्रीमद्भागवत - ११.२.३६
जी कर्मे शरीर, वाणी, मन, इंद्रियें, बुद्धी, व अहंकार याच्या द्वारा, जीव जाणून बुजून करतो, किंवा प्रारब्धयोगाने जी कर्मे त्याच्या हातून होतात, ती सर्व कर्मे (व त्यांची फळे) परमेश्वर जो नारायण त्याला अर्पण करावीं, (हा परम भागवतधर्म होय).
        मात्र आपण प्रार्थना म्हणताना त्यात थोडा बदल केलेला आहे आणि तो योग्यच आहे. 'असं करावं' अश्या अर्थाच्या मूळ श्लोकाचं आपण 'मी असं करतो' असं रूप केलं आहे व ते प्रार्थनेच्या संदर्भात योग्यच आहे. आपण म्हणतो त्या श्लोकाचा अर्थ असा सांगता येईल - 
जी कर्मे शरीर, वाणी, मन, इंद्रियें, बुद्धी, व अहंकार याच्या द्वारा, माझ्याकडून जाणून बुजून, किंवा अनाहूतपणे होतील ती सर्व कर्मे (व त्यांची फळे) मी नारायणाला अर्पण करतो. 













४. अच्युतं केशवं रामनारायणं...

अच्युतं केशवं रामनारायणं ।
कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ॥ 
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं ।
जानकीनायकं रामचन्द्रं भजे ॥

हे कडवे हा, आद्य शङ्कराचार्यांच्या अच्युताष्टकातील पहिला श्लोक आहे. 
    मी त्या अच्युताला, केशवाला, रामनारायणाला, दामोदर कृष्णाला,वासुदेवाला, हरिला, श्रीधराला,  माधवाला,  गोपिकांच्या प्रियाला, त्या जानकीनाथ रामचंद्राला भजतो. अश्या तर्‍हेने विविध नामांच्या रूपाने अच्युताचे स्मरण केलेले आहे. श्रीविष्णुच्या राम व कृष्ण या रूपांमधला आचार्यांनी स्पष्ट केलेला अभेद समजावून घेणे महत्त्वाचे आहे. 

५. हरे राम हरे राम...

हरे राम हरे राम ।
राम राम हरे हरे  ॥
हरे कृष्ण हरे कृष्ण ।
कृष्ण कृष्ण हरे हरे ॥
हे शेवटचे आणि पाचवे कडवे हा, तुलनेने अप्रसिद्ध अश्या, कलिसंतरण उपनिषदातील श्लोक आहे. 
    कलियुगात तरून जाण्यासाठी हरिनाम संकीर्तन हाच मार्ग आहे. या व्यतिरिक्त कलियुगात दुसरा तरणोपाय नाही. असे सांगून त्या नामस्मरणासाठी हा मंत्र देण्यात आलेला आहे. 


★★★★★

हे सर्व पाहिल्यानंतर आता काही नवे प्रश्न निर्माण होतात. ते म्हणजे, "घालिन लोटांगण" मध्ये ही पाच कडवी एकत्र का आली असतील? ती कोणी आणली? कधी?
    "गुरु की करनी गुरु जायेगा, चेले की करनी चेला, उड जायेगा हंस अकेला" हा विचार साधनेच्या संदर्भात आपल्याकडे बाहुल्यांने जाणवत असला तरीसुद्धा सामुदायिक आरती म्हणण्याची परंपरा महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर रूढ आहे. ती का? याचं निश्चित उत्तर माझ्याकडे उपलब्ध नाही. पण आपण शक्यतांचा विचार करायला घेतला तर काही गोष्टी जाणवतात -   
    संगीताचं भारताच्या भावविश्वातील स्थान अनन्यसाधारण आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व विधींमध्ये आपल्याकडे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात संगीत असते. तेव्हा दे देवपूजेत न येतं तरंच आश्चर्य होतं. आरत्या तालासुरात, एकत्र म्हणता येतात. त्यांची चाल साधी असते. संगीताचं शिक्षणंच काय, पण ते अंग अजिबात जरी नसलं तरीही आरती म्हणता येते.
     त्याचबरोबर आरत्या या स्फुट रचना असतात. आकारानी छोट्या असतात. त्यांचे स्वरूप पाठांतरासाठी सोपे असते. 
    आणखी एक शक्यता अशी की, आरत्या या प्रायः आत्मनिवेदनाच्या स्वरूपाच्या असतात. पूजापाठ हा बहुतेक वेळेला संस्कृतात होतो. त्यामुळे एक मांगल्याची भावना जरी निर्माण झाली तर त्यातल्या मंत्रांचा अर्थ प्रत्येकाला कळतोच असं नाही. त्यामुळे पूजा झाल्यानंतर होणार्‍या आरतीत, स्वतःच्या भाषेमध्ये, मोकळेपणाने, ईश्वराला आत्मनिवेदन करता येण्याची संधी मिळते. त्यातील शब्दांचं अर्थवाहित्व, त्या अर्थाचा सोपेपणा, त्या अर्थापर्यंत सहज पोहोचता येण्याची संधी, यामुळे आरत्यां लोकप्रिय झाल्या असणं शक्य आहे. 
    तसेच समाजातल्या सर्व स्तरांवरील संत-कवींच्या रचना आपल्याला लोकप्रिय आरत्यांमधे दिसतात. ही समानतेची व्यवस्था संस्कृत पूजा-विधीत दिसत नाही. 
    आरत्यांच्या लोकप्रियतेची ही सारी कारणे जर गृहित धरली तर, आरत्यांचेच हे सारे गुणधर्म ज्यात आहेत अश्या  "घालिन लोटांगण" मध्ये ही पाच कडवी का एकत्र आली असतील यासंबंधी काही अंदाज बांधणं शक्य आहे. 
    आरत्यांच्या काही प्रमाणात एकाच पद्धतीच्या चालीपेक्षा यात वृत्तांचं आणि त्यामुळे चालींचं वैविध्य आहे. छोट्या मुलांच्या आणि तरुणांच्या ऊर्जेला, द्रुत लयीत वाट करून देण्याची संधी आहे.
    यातील पाचपैकी चार कडवी जरी संस्कृत असली तरी ती कोणालाही सहज कळावीत इतकी सोपी आहेत. त्यातला आशय पाहिला तर त्यात सहज सोप्या शब्दातलं नामदेवरायांचं आत्मनिवेदन आहे. जशी सगुण उपासना आहे तसाच आत्मचिंतन करायला लावणारा दार्शनिक विचारही आहे. भक्तीबरोबर ज्ञानही आहे. संस्कृत भागवत पुराणापासून संतवाङ्मयापर्यंत भागवत धर्माच्या विविध पैलूंचं प्रतिनिधित्व आहे.  राम आणि कृष्णाच्या एकत्वाचा विचार आहे. आचार्यांची अद्वैतभक्ती आहे. उपनिषदांचा समावेश आहे तसाच रामायण-महाभारताचाही आहे. 
    एका अर्थाने सगळ्या भारतीय संस्कृतीचं सारच त्यात आणलं गेलं आहे असं म्हणता येईल.
    ही पाच कडवी कोणी प्रथम एकत्र जोडली माहिती नाही. मला उपलब्ध झालेला जुन्यातला जुना आरती संग्रह १८८८ सालचा आहे. ती सुद्धा तिसरी आवृत्ती आहे, म्हणजे पहिली आवृत्ती आणखी जुनी असणार.  

यातही सर्व आरत्यांनंतर, शेवटी, 'प्रार्थना' या शीर्षकाखाली 'घालिन लोटांगण' चा समावेश आहे. तेव्हा सुमारे १३५ वर्षे तरी ही प्रथा चालू आहे असं आपण म्हणू शकतो आणि या काव्यांच्या ज्ञात-अज्ञात कवींबरोबरच ती एकत्र आणणार्‍या 'दुर्लभ योजकालाही' धन्यवाद देऊ लागतो.

संदर्भ

  • संत नामदेवांचा सार्थ चिकित्सक गाथा - अभंग क्र १२५५ | संपादक - कानडे, मु श्री; नगरकर, रा शं | श्रीसमर्थ ग्रंथ भवन | पुणे | २०१२ | पृष्ठ ७३८ 

  • बृहत्स्तोत्ररत्नाकरः द्वितीयो भागः | संपादक - आचार्य, नारायण राम | निर्णयसागर | मुंबई | १९५३ | पृष्ठ ८१४-१५
  • सुलभ-सार्थ श्रीमद्भागवत -भाग ६वा - स्कंध ११ वा | दामोदर सावळाराम आणि मंडळी | मुंबई | १९२९ | पृष्ठ  २१-२२ 
  • श्रीमदाद्यशंकराचार्यकृत सुबोधस्तोत्रसंग्रह - भाग पहिला | गोस्वामी, पांडुरंगशास्त्री गणेशशास्त्री | अध्यात्मपरिषद् सांगली ग्रंथमाला | १९७० | पृष्ठ ७२
  • ईशाद्यष्टोत्तरशतोपनिषदः | संपादक - पणशीकर, वासुदेव लक्ष्मण | निर्णयसागर | मुंबई | १९२५ | पृष्ठ ५४६
  • आरती संग्रह | पोतदार, वासुदेव मोरेश्वर | जगदीश्वर छापखाना | मुंबई | १८८८ | पृष्ठ १८४

********************************************************************************
घालिन लोटांगण... copyright © 2023 by Sushrut Vaidya. All rights reserved. No part of this work may be used or reproduced in any manner whatsoever without written permission. No changes or edits in the content of this work or of the digital format are allowed. For information, write Sushrut Vaidya at sushrut.vaidya@gmail.com.


Comments

Popular posts from this blog

दो अंतरों के बीच में…

पीछे   रेडियो पे   गाना चल रहा है.... हाथ थे मिले की   जुल्फ   चाँद की सवार दूँ होठ   थे खुले की हर बहार को   पुकार   दूँ दर्द था दिया गया की हर दुःखी को प्यार दूँ और सांस यों की स्वर्ग भूमि पर उतार दूँ                     और   मैं   सोच रहा हूँ....                     जो यकीनन पाया उसका ,                     जो शायद पाया होगा उसका भी ,                     जो पा सकते थे... नही पाया , लेकिन उसकी   जानिब   दो कदम चले तो सही                     इसी खुशी का एहसास ,                     खुद ही खुद को , बिना-थके ,  दिलाते   रहने का ही                     जश्न मनाने के इस  ...

तुझिये निढळीं...

हे संत ज्ञानदेवांचं भजन - तुझिये निढळीं... एका प्रकट कार्यक्रमात बालगंधर्वांनी गायलेलं ध्वनिमुद्रण आहे हे.  जुनं आणि प्रकट कार्यक्रमातलं असल्यामुळे फार चांगलं नाहीये. पण त्याच्या सगळ्या बाह्य दोषांतून आणि मर्यादांतूनही त्याचं सौंदर्य आणि त्याची शक्ती दोन्ही पूर्ण प्रकट होतात हा माझा अनुभव आहे.  हे म्हणजे वेरूळच्या आजच्या भग्न मूर्तीकडे पाहावं आणि ती तिच्या मूळ स्वरूपात दिसावी तसं आहे थोडंसं... भगवंतांनी गीतेत म्हंटलं आहे - यः पश्यसि स पश्यसि - ज्याला दिसतं त्याला दिसतं.... तसं काहीसं.  ही चाल मास्तरांची... मा. कृष्णरावांची... आहे. त्यांची स्वतःची या गाण्याची उत्तम ध्वनिमुद्रण असलेली ध्वनिमुद्रिका आहे. माझ्याकडे आहे.  छान आहे.   पण हे ऐकल्यानंतर पुन्हा 'त्यांचं' ऐकावं अशी इच्छा मला झालेली नाही.  संगीतकाराने स्वतः गायलेलं गाणं हे कोणत्याही गायकाने गायलेल्या आवृत्तीपेक्षा सरस असतं म्हणतात. शंभरातल्या नव्व्याण्णव वेळा ते खरंही आहे. पण काही गायकांच्या गळ्याला अद्भुताचा, परतत्त्वाचा स्पर्श असतो. त्यातून व्यक्त होणारा आवाज त्या स्पर्शामुळे एक वेगळी अनुभूती दे...

पं. कुमार गंधर्व आणि भा. रा. तांबे

सखोल, मूलगामी  चिकित्सा; स्वतंत्र विचार; आपण जे करतो ते ‘का’ करतो याची पक्की जाणीव; कोणत्याही प्रभावापुढे डगमगून न जाता ह्या जाणिवेवर ठाम राहण्याची ‘निर्भय साधना’; आणि ह्या सर्वांबरोबर अतिशय प्रभावी, कलात्मक व सौंदर्यपूर्ण सृजन करू शकणार्‍या; अक्षरशः एका हाताच्या बोटावर मोजता येतील अशा महान कलाकारांमधे कुमारजींचा समावेश होतो. त्यांच्या सर्वस्पर्शी व्यासंगाला आणि कुतुहलाला कोणताही विषय वर्ज्य नव्हता. कुमारजींच्या प्रत्येकच प्रस्तुतीत त्यांच्या ह्या सर्वस्पर्शी व्यासंगाचे दर्शन व्हायचे. विषयवस्तूची मांडणी साकल्याने, सर्व बाजूंनी विचार करून केलेली असायची. त्यात वर्षानुवर्षे गृहित धरलेल्या विचारांना छेद देऊन, अतिशय आनंददायक असा नवा विचार देण्याचे सामर्थ्य होते. ह्या सामर्थ्यामुळेच कुमारांचे रसिकांच्या मनात एकमेवाद्वितीय असे स्थान आहे. त्यांनी लोकांसमोर मांडलेले कवी-दर्शनाचे कार्यक्रमही ह्याला अपवाद नव्हते. कुमारजींनी भारतीय परंपरेतील अनेक कवींच्या रचना रसिकांपुढे सादर केल्या. ह्यात अनेक संत-कवींचा समावेश होता. मात्र ह्या मालिकेतील प्रत्येक संत -  कबीर, मीरा, सूरदास, तुलसीदास व तुक...