Skip to main content

सुमनआत्या...

वडीलधार्‍या माणसांच्या संस्काराचे मोल कळण्यासाठी आपल्या स्वत:ला
, बहुधा, अगदी वडीलधारे नाही, पण किमान प्रौढ तरी व्हावे लागते. दुर्दैव हे, की तो पर्यंत आपल्यावर  संस्कार करणारी वडीलधारी माणसे वृद्ध झालेली असतात, आणि अनेकदा कायमची निघूनही गेलेली असतात. त्या संस्कारांचे ऋण त्यांच्यापुढे व्यक्त करणे मग राहून जाते, ते कायमचेच.

२८ जूनला आत्या गेली. जवळजवळ सहस्रचंद्रदर्शन करून, नंतर एका फार मोठ्या आजाराला वर्ष-दीड वर्ष मोठ्या धैर्याने तोंड देऊन गेली. मिळालेल्या दीर्घायुष्याचा, मला ठाऊक असलेल्या बहुतेकांपेक्षा, अधिक चांगला उपयोग करून गेली. पण तरीही तिने केलेल्या संस्कारांचे ऋण व्यक्त करण्याचे राहूनच गेले.

आत्या ‘उच्चविद्याविभूषित’ म्हणतात तशी होती. इतकंच नव्हे तर संशोधक, विचारवंत आणि शिक्षणतज्ञ होती. एखाद्या विषयाची साग्रसंगीत, सांगोपांग, सखोल, तर्क-विवेकाने, चिकित्सा करून ती अभ्यासपूर्ण भाषेत मांडणारी होती. अर्थातच तिने मला शिकवलेल्या गोष्टींमध्ये वैचारिक, बौद्धिक गोष्टी तर होत्याच. पण मी तसा, लौकिकार्थाने, डॉ. सुमन करंदीकरांचा विद्यार्थी नाही. ‘आपणच’शी माझा संबंध असला तरीसुद्धा मी काही त्यांच्याबरोबर काम केलेला कार्यकर्ताही नाही. माझा तिचा परिचय मी साधारण सहावी-सातवीत असल्यापासूनचा. मित्राची आत्या, म्हणून माझीही आत्या! त्यामुळे माझ्यासाठी त्या ‘बाई’ ही नव्हत्या किंवा  ‘सुमनताई’ ही नव्हत्या. ती सुमन-आत्या होती.

त्यामुळेच मला तिच्याकडून जे मिळालं त्याचं वर्णन ‘शिक्षण’ असं करता येऊ शकणारच नाही असं नाही, पण त्याला खरा यथायोग्य शब्द ‘संस्कार’ हा आहे. तिने केलेले हे संस्कार ‘वैचारिक’ गोष्टींच्या पलीकडे जाणारे होते. एखाद्या माणसाचे ‘विचार’ दुसर्‍याला सांगता येतील, पण त्या माणसाची ‘सात्विकता’, त्याच्या ‘व्यक्तित्वाची शक्ती’ ही प्रत्यक्ष अनुभवावीच लागते. आत्याने केलेले संस्कार हे या तिच्या सात्विकतेचाच, तिच्या ‘व्यक्तित्वाच्या शक्तीचा’ परिणाम होते.  

आज, ती आता नसताना, या संस्कारांची जर चिकित्सा करायची म्हंटलं तर काय जाणवतं?

सर्वप्रथम जाणवतं ते तिचं संवेदनशील, सज्जन, करुणाशील, आणि आशावादी व्यक्तिमत्व. या यादीतला प्रत्येक शब्द हा विचारपूर्वक आणि अनुभवातून आलेला आहे.

तिचं मन संवेदनशील होतं. दुसर्‍याचं दु:ख तिला अंत:स्फूर्तिने जाणवायचं. त्याचा तिला त्रास व्हायचा, आणि ते कमी करण्यासाठी जे काही तिच्या परीने शक्य असेल ते ती करायची. तिच्या शेवटच्या आजारपणातसुद्धा कधीही तिला फोन केला तरी आपल्याला तिच्या तब्येतीची विचारपूस करू देण्या अगोदर, ‘तू कसा आहेस?’ ‘आई कशी आहे?’ ही विचारणा तिच्याकडून प्रथम व्हायची. तिच्या बोलण्यातून व्यक्त होणारी इतरांबद्दलची ही काळजी, प्रामाणिक आणि कळकळीची होती, आणि ती तिच्या आयुष्यभराच्या वागण्यात सतत व्यक्त होतच राहिली.

खराखुरा ‘शिक्षक’ होणं ही फार अवघड गोष्ट आहे. असा शिक्षक होण्यासाठी मुळात स्वतःच्या गरजेपेक्षा समोरच्या विद्यार्थ्याच्या कल्याणाची चिंता अधिक करणं आवश्यक असतं. त्यासाठी कोणतीही गोष्ट समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या गटातील प्रत्येकाला कळेपर्यंत परत- परत, त्याच उत्साहाने, न कंटाळता, न चिडता, सांगता येण्याची क्षमता असावी लागते; आणि ती क्षमता निर्माण होण्यासाठी आवश्यक असणारं मोठं मन असावं लागतं. ते तिच्याजवळ होतं. या कळकळीमागे जी करुणा होती ती सहानुभूतीतून – सह-अनुभूतीतून आलेली होती. आपण सगळे कधी ना कधी या अवस्थेतून गेलेले आहोत या जाणि‍वेतून, आपल्या स्वतःच्या अपरिपक्व अवस्थेच्या काळाची स्वत:ला विस्मृती न होऊ देण्याच्या प्रगल्भतेतून, आलेली होती. त्यामुळेच तिच्या वागण्यातल्या सज्जनपणातून ती व्यक्त होत असे. मीच काय पण कोणीच तिला संतापून बोलताना फारसं पाहिलेलं नसणार. त्याच बरोबर नैतिक वर्तनाच्या आग्रहातूनही तिचा हा सज्जनपणा सतत व्यक्त होत आला.

पण या सगळ्या गुणांमधेही अधिक उठून दिसणारा तिचा कोणता गुण असेल तर तिचा दुर्दम्य आशावाद. तिची समोरच्या माणसातील चांगलं तेच पाहण्याची वृत्ती. हा गुण तिच्या स्वभावाचा भाग बनला होता की तिचा मूळचा स्वभावच या रुपाने व्यक्त व्हायचा हे ठरवणं अवघड आहे. तिच्याशी बोलताना हे सतत जाणवायचं की दुसर्‍यातलं चांगलं तेच पाहण्याची वृत्ती हा जणू तिला प्रत्येकाचाच नैसर्गिक गुण असावा असे वाटत असावे. 

मी मागे एकदा कोण्या एका योग्याची एक गोष्ट ऐकली होती. त्यांना म्हणे लहानपणापासूनच रात्री झोप लागायच्या वेळेस एक मोठा प्रकाश दिसायचा आणि तो प्रकाश मोठा होत-होत त्यांना संपूर्णपणे सामावून घ्यायचा आणि त्यांना झोप लागायची. त्यांच्या एका सहाध्यायाला ही कथा सांगितल्यानंतर त्याला अर्थातच हे काहीतरी अद्भुत आहे असे वाटले. परंतु त्याच्या तसे वाटण्याचे या योग्याला मात्र आश्चर्य वाटले. त्यांची प्रतिक्रिया होती – “म्हणजे सगळ्यांनाच असा प्रकाश दिसत नाही का?”

माणसाच्या चांगुलपणावरचा आत्याचा विश्वास हा त्या योग्याला दिसणार्‍या प्रकाशासारखा होता असे वाटते. म्हणजे “प्रत्येक माणूसच दुसर्‍याच्या चांगुलपणावर असा पूर्ण विश्वास ठेवत नाही का?” असा प्रश्न बहुधा तिला पडत असावा, इतकी ती जाणीव तिच्यासाठी  स्वाभाविक होती. खूपदा या वृत्तीचा तिला त्रासही व्हायचा. काहींनी तरी तिच्या या विश्वासाचा गैरफायदा घेतला असणारच. शिवाय संस्था उभी करताना इतकी टोकाची आशावादी व क्षमाशील भूमिका घेऊन चालत नाही, त्याने संस्था मोठी व्हायला, तिची प्रगती व्हायला गरजेपेक्षा अधिक वेळ लागतो, इत्यादी गोष्टी तिला अनेकांनी सांगितल्या. पण त्यामुळे तिचा हा माणसाच्या चांगुलपणावरचा विश्वास कणभरही ढळला नाही.

हा  विश्वास, ही श्रद्धा येते कुठून?  मला वाटतं तिच्या बाबतीत या प्रश्नाचं उत्तर होतं -  तिच्या आध्यात्मिकतेतून. तिच्या संपूर्ण अस्तित्वाला एक फार मोठं आध्यात्मिक अधिष्ठान होतं. तिचा जवळून परिचय असलेल्यांना त्याची जाणीव होती. पण तिने आपल्या आध्यात्मिकतेचा बडेजाव कधी मिरवला नाही किंवा त्याची कधी साधी चर्चाही केली नाही.

आध्यात्मिक बैठक असलेल्या माणसांच्या तथाकथित आध्यात्मिकतेची अभिव्यक्ती आधुनिक जगामध्ये अनेकदा पांडित्याच्या गर्वाच्या रूपाने किंवा दांभिकतेने होताना दिसते. अनेकदा तिचा परिणाम जगाकडे पाठ फिरवून जाण्यातही होताना दिसतो. पण खरी आध्यात्मिकता माणसाला सात्विक, नम्र, संवेदनशील  बनवते. त्याच्यात करूणेचा उदय घडवते, त्याला कृतिशील बनवते. आत्याच्या वागण्यात या सर्व गोष्टींची अभिव्यक्ती सातत्याने दिसायची. यामुळेच झालेला गोष्टींचे चिंतन करणे, त्यातून स्वतःत काय सुधारणा करता येतील याचा विचार करणे, या चिंतनातून जे हाताला लागेल ते निःस्वार्थीपणे इतरांबरोबर वाटून घेणे, ज्यांना आवश्यकता असेल त्यांना समजावून सांगणे या गोष्टी तिच्या स्वभावाचा भागच बनून गेलेल्या होत्या.

रामायण-महाभारतातल्या कथा अनेकदा तत्त्वज्ञानाची उघड, पांडित्यपूर्ण चर्चा न करताही, केवळ त्यातील पात्रांच्या वागण्यामुळे, स्वभावामुळे, वाचणार्‍याच्या मनावर खोल, दूरगामी संस्कार करतात. हे संस्कार माणसाला आतून बदलत जातात. त्यांच्यामुळे आपल्यात होणारा बदल, तो होत असताना, त्यांना अनेकदा जाणवतही नाही,  पण तो संस्कार परिपक्व झाला की त्याची प्रचिती त्यांच्या वागण्यातून येऊ लागते. अशी आध्यात्मिकता अंगी मुरलेल्या माणसांचे वागणेही इतरांसाठी, त्या मूळच्या बोधकथांचे काम करू लागते.

आत्याच्या व्यक्तित्वाची, स्वभावाची व वागण्याची आज जर चिकित्सा करू जावे, तर या बोधकथांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. अशी माणसे फार दुर्मिळ तर असतातच, पण अनेकदा ती भेटूनही, ती आपल्यातून गेल्याशिवाय त्यांचं मोल नेमकं कळत नाही. जवळच्या माणसांना आपण गृहित धरून चालतो. ते गेल्यावरच अनेकदा आपण नेमकं काय गमावलं याची जाणीव होते. अनेकदा यातून, ‘आता हाती काहीच राहिलं नाही’ असं वाटू लागतं. मात्र काही थोड्यांच्या बाबतीत त्यांनी दिलेले हे संस्कार आपल्याबरोबर शिल्लक राहतात. ती माणसेही त्या संस्कारांच्या रूपाने आपल्याबरोबर राहतात. अशी ‘वडीलधारी माणसे’ आपल्या आयुष्यात येणं हे आपलं भाग्य.

आत्या अश्या माणसांपैकी एक होती.      

Comments

Popular posts from this blog

दो अंतरों के बीच में…

पीछे   रेडियो पे   गाना चल रहा है.... हाथ थे मिले की   जुल्फ   चाँद की सवार दूँ होठ   थे खुले की हर बहार को   पुकार   दूँ दर्द था दिया गया की हर दुःखी को प्यार दूँ और सांस यों की स्वर्ग भूमि पर उतार दूँ                     और   मैं   सोच रहा हूँ....                     जो यकीनन पाया उसका ,                     जो शायद पाया होगा उसका भी ,                     जो पा सकते थे... नही पाया , लेकिन उसकी   जानिब   दो कदम चले तो सही                     इसी खुशी का एहसास ,                     खुद ही खुद को , बिना-थके ,  दिलाते   रहने का ही                     जश्न मनाने के इस  ...

तुझिये निढळीं...

हे संत ज्ञानदेवांचं भजन - तुझिये निढळीं... एका प्रकट कार्यक्रमात बालगंधर्वांनी गायलेलं ध्वनिमुद्रण आहे हे.  जुनं आणि प्रकट कार्यक्रमातलं असल्यामुळे फार चांगलं नाहीये. पण त्याच्या सगळ्या बाह्य दोषांतून आणि मर्यादांतूनही त्याचं सौंदर्य आणि त्याची शक्ती दोन्ही पूर्ण प्रकट होतात हा माझा अनुभव आहे.  हे म्हणजे वेरूळच्या आजच्या भग्न मूर्तीकडे पाहावं आणि ती तिच्या मूळ स्वरूपात दिसावी तसं आहे थोडंसं... भगवंतांनी गीतेत म्हंटलं आहे - यः पश्यसि स पश्यसि - ज्याला दिसतं त्याला दिसतं.... तसं काहीसं.  ही चाल मास्तरांची... मा. कृष्णरावांची... आहे. त्यांची स्वतःची या गाण्याची उत्तम ध्वनिमुद्रण असलेली ध्वनिमुद्रिका आहे. माझ्याकडे आहे.  छान आहे.   पण हे ऐकल्यानंतर पुन्हा 'त्यांचं' ऐकावं अशी इच्छा मला झालेली नाही.  संगीतकाराने स्वतः गायलेलं गाणं हे कोणत्याही गायकाने गायलेल्या आवृत्तीपेक्षा सरस असतं म्हणतात. शंभरातल्या नव्व्याण्णव वेळा ते खरंही आहे. पण काही गायकांच्या गळ्याला अद्भुताचा, परतत्त्वाचा स्पर्श असतो. त्यातून व्यक्त होणारा आवाज त्या स्पर्शामुळे एक वेगळी अनुभूती दे...

पं. कुमार गंधर्व आणि भा. रा. तांबे

सखोल, मूलगामी  चिकित्सा; स्वतंत्र विचार; आपण जे करतो ते ‘का’ करतो याची पक्की जाणीव; कोणत्याही प्रभावापुढे डगमगून न जाता ह्या जाणिवेवर ठाम राहण्याची ‘निर्भय साधना’; आणि ह्या सर्वांबरोबर अतिशय प्रभावी, कलात्मक व सौंदर्यपूर्ण सृजन करू शकणार्‍या; अक्षरशः एका हाताच्या बोटावर मोजता येतील अशा महान कलाकारांमधे कुमारजींचा समावेश होतो. त्यांच्या सर्वस्पर्शी व्यासंगाला आणि कुतुहलाला कोणताही विषय वर्ज्य नव्हता. कुमारजींच्या प्रत्येकच प्रस्तुतीत त्यांच्या ह्या सर्वस्पर्शी व्यासंगाचे दर्शन व्हायचे. विषयवस्तूची मांडणी साकल्याने, सर्व बाजूंनी विचार करून केलेली असायची. त्यात वर्षानुवर्षे गृहित धरलेल्या विचारांना छेद देऊन, अतिशय आनंददायक असा नवा विचार देण्याचे सामर्थ्य होते. ह्या सामर्थ्यामुळेच कुमारांचे रसिकांच्या मनात एकमेवाद्वितीय असे स्थान आहे. त्यांनी लोकांसमोर मांडलेले कवी-दर्शनाचे कार्यक्रमही ह्याला अपवाद नव्हते. कुमारजींनी भारतीय परंपरेतील अनेक कवींच्या रचना रसिकांपुढे सादर केल्या. ह्यात अनेक संत-कवींचा समावेश होता. मात्र ह्या मालिकेतील प्रत्येक संत -  कबीर, मीरा, सूरदास, तुलसीदास व तुक...