मुळात राष्ट्र-काहीही
बद्दल चर्चा करण्याआधी मुद्दलात राष्ट्र नावाचे आपण काही मानतो का.. असल्यास ते
केवळ आधुनिक नेशन-स्टेट पुरते – म्हणजे फक्त घटना-कायद्याने १९४७ साली निर्माण
झालेले राष्ट्र मानतो का... की त्या मागच्या भारतीय संस्कृतीचा त्या ‘राष्ट्रात’
काही सहभाग आहे.., असल्यास त्याचे आधुनिक राष्ट्राच्या संदर्भात तारतम्य काय,
स्थान काय.. ह्या सर्व गोष्टींबद्दल चर्चा व्हायला हवी.
लिंग्वा फ्रँका ही एका काळातील विविध भाषा बोलणार्या लोकसमूहांना कामापुरते का होईना जोडण्याचे काम करते. तसेच काम भौगोलिक अंतराने नव्हे तर काळाने एकमेकांपासून लांब असलेल्या लोकसमूहांना जोडण्याचे काम संस्कृतने केलेले आहे. लोकभाषेवर पाणिनीच्या व्याकरणाचे संस्कार होऊन ती निर्माण झाली वगैरे सगळे ठीक – पण ती तशी व्हावी, अशा भाषेची काही गरज आहे असे त्याकाळातील लोकांना का वाटले असावे ह्याचा विचार व्हायला हवा. आपली संस्कृती काळाच्या आव्हानाला तोंड देऊन टिकावी ही प्रेरणा आपल्या इतिहासात सर्वत्र दिसते – त्यामागे कुठेतरी आपल्या प्राचीनतेची नाळ आपल्या वर्तमानाला जोडण्याची प्रेरणा आहे.
'आपण १९४७ पूर्वीचं काही मानतो का' हा प्रश्न म्हणजेच ‘ही प्रेरणा आपल्याला आता कालबाह्य वाटते का’ हा प्रश्न आहे. तशी वाटत असेल तर मग सगळी मांडणीच त्या अंगाने करायला हवी. मग सारनाथचे सिंह, अशोक चक्र, महाभारतातून आलेले देशाचे नाव हे सगळंच त्याज्य मानून नव्या गोष्टी निर्माण कराव्यात! तसे का करत नाही? सारनाथचे चिह्न प्रतीक म्हणून मान्य – पण संस्कृत मात्र प्रतीक म्हणून अमान्य ही भूमिका किती योग्य आहे ह्याचा विचार व्हायला हवा. इथे संस्कृतचे, राजकीय सोयीसाठी, एका विशिष्ट वर्गाशी जोडले गेलेले नाते आड येते का ह्याचाही विचार करायला हवा.
ते केले तर मग डॉ. आंबेडकर किंवा तत्कालीन इतर नेत्यांनी संस्कृत राष्ट्रभाषा करण्यासंबंधी विचार का केला असावा ह्याचा उलगडा होऊ शकेल. खर्या अर्थाने पुरोगामी विचार आवश्यकच आहे. पण आपण त्या पुरोगामीपणाचाच पोथिनिष्ठ पंथ करून त्यात न बसणार्या सगळ्यांनाच ‘बाहेरचे’ ठरवत नाही ना ह्याचाही विचार व्हायला हवा. तसं होत असेल तर एक राष्ट्र वगैरे लांब राहिलं, पण साधा एक शेजार सुद्धा आपण निर्माण करू शकणार नाही.
आपल्याला जोडणारी प्रत्येक प्राचीन गोष्ट जर राजकीय सोयीसाठी किंवा बौद्धिक अहंकारासाठी नाकारत गेलो तर बाबासाहेबांना व आपणा सर्वांना अभिप्रेत असलेली ‘बंधुता’ आपण कशी आणणार हा खरा प्रश्न आहे.

Comments