“ एअरपोर्टला जाण्यासाठीची टॅक्सी आत्ता तासभरात येईल. तू खरंच ‘आत्ता’ तिला भेटायला जाणार आहेस का ? ” मी तसा महिन्याभरातच परत येण्याच्या हिशोबानी प्रवासाला निघालो होतो. त्यामुळे अगदी तातडीनं तिला आजच भेटण्याची काही आवश्यकता होतीच असं नाही. तिचं वय खूप झालं होतं, ती थकली होती, हे खरंच.. पण मग काय झालं, महिनाभरानी भेटूच असं म्हणता आलं असतं. पण त्या दिवशी का कुणास ठाऊक, मला असं वाटलं की जाऊन यावंच. तिला भेटलो. पाऊण-एक तास छान गप्पा झाल्या. नेहमीच व्हायच्या. तिला माझ्याबद्दल असलेली माया, प्रेम, कौतुक विलक्षण होतं. ती मायाळू होतीच आणि मलाही मागच्या पिढीबद्दल खूप भावनिक जवळीक वाटते, पण त्याही पलीकडे जाऊन आम्हाला एकमेकांबद्दल वाटणारी जवळीक विलक्षण होती. आमच्या त्या शेवटच्या भेटीला उणेपुरे दोन आठवडेही झाले नसतील आणि काल ती गेली. त्या दिवशी तिला भेटायला जायची मला झालेली तीव्र जाणीव ही जणू काही नियतीच्या अटळ पावलांची माझ्या हितकर्त्या देवतांनी मला दिलेली पूर्वसूचनाच होती असं आता म्हणायला पाहिजे. माझ्या वडीलांची मोठी बहीण. त्यांच्या पिढीतल्या सहा भावंडांपैकी शेवटची शिल्लक असलेली सिंधुआत्...
Extroversions of an Introvert Mind