"घालिन लोटांगण वंदीन चरण" ही प्रार्थना आपण गणेशोत्सवात आरतीनंतर नित्यनेमाने म्हणतो. या प्रार्थनेमध्ये पाच वेगवेगळी कडवी समाविष्ट आहेत. त्यातील एक मराठी आहे व इतर चार संस्कृतात आहेत. यातल्या प्रत्येक कडव्याचा स्रोत वेगवेगळा आहे. मात्र पुष्कळांना ही कडवी किंवा हे श्लोक मूळ कुठून आलेले आहेत किंवा ते कोणी रचले आहेत याची माहिती नसते. यासाठीच, त्या पाचही कडव्यांच्या स्रोतांची जी काही माहिती मला उपलब्ध आहे, ती देण्याचा या पोस्टमध्ये प्रयत्न केलेला आहे. या कडव्यांच्या मूळ स्रोताच्या पुस्तकातल्या पानांची छायाचित्रेही मी दिलेली आहेत, की जेणेकरून त्या श्लोकाच्या आसपासचा काही संदर्भही वाचकांना उपलब्ध होऊ शकेल. पुस्तकांचे संदर्भही शेवटी दिलेले आहेत. १. घालिन लोटांगण... घालिन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहीन रूप तुझे ॥ प्रेमे आलिंगिन आनंदें पूजिन । भावें ओवाळिन म्हणे नामा ॥ हे पहिलं कडवं हा संतश्रेष्ठ श्रीनामदेवरायांचा अभंग आहे. श्री कानडे व श्री नगरकरांनी संपादित केलेल...
Extroversions of an Introvert Mind