वडीलधार्या माणसांच्या संस्काराचे मोल कळण्यासाठी आपल्या स्वत:ला , बहुधा, अगदी वडीलधारे नाही , पण किमान प्रौढ तरी व्हावे लागते. दुर्दैव हे , की तो पर्यंत आपल्यावर संस्कार करणारी वडीलधारी माणसे वृद्ध झालेली असतात , आणि अनेकदा कायमची निघूनही गेलेली असतात. त्या संस्कारांचे ऋण त्यांच्यापुढे व्यक्त करणे मग राहून जाते , ते कायमचेच. २८ जूनला आत्या गेली. जवळजवळ सहस्रचंद्रदर्शन करून , नंतर एका फार मोठ्या आजाराला वर्ष-दीड वर्ष मोठ्या धैर्याने तोंड देऊन गेली. मिळालेल्या दीर्घायुष्याचा , मला ठाऊक असलेल्या बहुतेकांपेक्षा, अधिक चांगला उपयोग करून गेली. पण तरीही तिने केलेल्या संस्कारांचे ऋण व्यक्त करण्याचे राहूनच गेले. आत्या ‘उच्चविद्याविभूषित’ म्हणतात तशी होती. इतकंच नव्हे तर संशोधक, विचारवंत आणि शिक्षणतज्ञ होती. एखाद्या विषयाची साग्रसंगीत , सांगोपांग , सखोल , तर्क-विवेकाने , चिकित्सा करून ती अभ्यासपूर्ण भाषेत मांडणारी होती. अर्थातच तिने मला शिकवलेल्या गोष्टींमध्ये वैचारिक , बौद्धिक गोष्टी तर होत्याच. पण मी तसा, लौकिकार्थाने, डॉ. सुमन करंदीकरांचा विद्यार्थी नाही. ‘आपणच’शी माझा संबंध असला तरी...
Extroversions of an Introvert Mind