मी शाळेत असताना जे लेखक वाचत मोठा झालो, ज्यांची पुस्तकं वेड्यासारखी वाचली, परत-परत वाचली, ज्यांनी माझं लहानपण अक्षरश: घडवलं, त्या हाताच्या बोटांवर मोजण्यासारख्या चार-पाच लेखकांमध्ये बाबासाहेब होते. त्यांचं ‘राजा शिवछत्रपती’ मी इतक्या वेळा वाचलंय की त्याला गणतीच नाही. माझ्याकडे आज असलेली त्याची प्रत, ही तिसरी प्रत आहे. त्याच्या पहिल्या दोन प्रती मी इतक्या वेळा वाचल्या आहेत, की वाचून-वाचून त्याचं पान अन् पान सुटं होऊन त्या खराब झाल्या. तिसर्या प्रतीचीही अवस्था काही फार वेगळी नाहीये. इतिहास म्हणजे काय? इतिहासाचा अभ्यास कसा करायचा असतो? त्याच्यातलं खरं-खोटं काय? पुरावे कोणते? त्याच्या मागच्या राजकीय विचारधारा काय आहेत? इतर सिद्धांत कुठले? हा सगळा विचार खूप-खूप नंतर आला. या सगळ्याच्या आधी 'शि-वा-जी' या तीन अक्षरांबद्दल प्रेम, आदर, आपलेपणा, खरं तर भक्ती निर्माण करण्याचं काम बाबासाहेबांच्या 'राजा शिवछत्रपती'ने केलं. शिवाजी महाराजांना आमच्या आयुष्याचाच नाही तर, व्यक्तिमत्वाचा, अगदी रक्ताचा भाग बनवण्याचे काम या पुस्तकाने केलं. त्या काळात वाचलेल्या कुठल्याही खऱ्या किंवा काल्पनिक...
Extroversions of an Introvert Mind